सेना, राष्ट्रवादीने वन अधिकाऱ्यांना घेरले

By Admin | Updated: July 10, 2014 00:28 IST2014-07-10T00:26:29+5:302014-07-10T00:28:48+5:30

हत्ती हल्ला मृत्यूप्रकरण : पालकमंत्र्यांकडून बुटे कुटुंबियांचे सांत्वन

Army, NCP surrounded forest officials | सेना, राष्ट्रवादीने वन अधिकाऱ्यांना घेरले

सेना, राष्ट्रवादीने वन अधिकाऱ्यांना घेरले

माणगाव : हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या बाबूराव बुटे यांचा मृतदेह शवागृहात असताना हत्तींच्या गंभीर प्रश्नावरून ग्रामस्थांसह शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सुमारे २७ तास वनाधिकाऱ्यांना घेराव घातला. आंदोलनकर्त्याबरोबर चर्चेसाठी आलेले मुख्य वनसंरक्षक एम. के. राव पालकमंत्र्यांसोबतच ओरोसला निघाल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले.
आमदार दीपक केसरकरांनी वनविभागाचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हत्ती हटविण्याचे आदेश देत असल्याची माहिती केसकरांना दिल्यानंतरच आंदोलनकर्ते शांत झाले. पालकमंत्री नारायण राणे यांनीही बुटे कुटुंबियांचे सांत्वन करत आर्थिक मदत केली.
निवजे ख्रिश्चनवाडीतील बाबूराव बुटे यांचा सोमवारी रात्री हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मंगळवारी बुटेंच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर हत्तीबाधित क्षेत्रातील ग्रामस्थांनीही सावंतवाडी उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, सहाय्यक उपवनरक्षक टी. पी. पाटील यांना घेरावा घातला. मंगळवारची रात्रही वन अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसोबतच घालविली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी मुख्य वनसंरक्षक एम. के. राव यांना आंदोलनकर्त्यांना भेट देण्याचे आवाहन केले व त्यांनी भेटण्याचे मान्य केले.
पालकमंत्र्यांच्या ताफ्यासोबतच मुख्यवनसंरक्षक राव हे देखील निघून गेल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनीही आंदोलकांना आटोपते घेण्याची विनंती केली. यावेळी मुख्य वनसंरक्षक राव हे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा न करता पालकमंत्र्यांसोबत निघून गेल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले. मात्र, राव चर्चेसाठी येत असल्याचे समजताच आमदार केसरकरांनी वन विभागाचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधला. परदेशी यांनी हत्तींना पकडण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
आमदार केसरकर यांनी हत्तीबाधित क्षेत्रासाठी हत्ती हटाव मोहीम सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी तसेच ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी होमगार्ड, पोलिसांची स्वतंत्र गाडीसह तीन गाड्या तैनात राहणार असल्याची माहिती दिली. बुटे कुटुंबियांना आमदार केसरकर व वैभव नाईक यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची मदत जाहीर
केली. (प्रतिनिधी)


- या घेराओ आंदोलनाची दखल पालकमंत्री नारायण राणे यांनी घेत बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार जयराज देशमुख आदी अधिकाऱ्यांसह आंबेरी चेकनाका येथे हजेरी लावली. बुटे यांचे नातेवाईक व निवजे सरपंच महेंद्र पिंंगुळकर यांच्याकडून घटनेची माहिती घेत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निर्णय देऊ, अशी ग्वाही दिली. यावेळी बुटे कुटुंबियांना एक लाखाची आर्थिक मदतही केली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी वनविभागाच्या आंदोलनकर्ते बसलेल्या खोलीत जात शासनाच्या जागेत आंदोलनकर्त्यांना प्रवेश कसा देण्यात आला, संबंधित वनाधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांना निलंबित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
आंदोलकांनी मृतदेहाची गाडी रोखली
-पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर निवजे पोलीस पाटील व बुटे यांच्या मुलाने मृतदेह ताब्यात घेत निवजेच्या दिशेने आणला. मात्र, याची कल्पना आंदोलनकर्त्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे आक्रमक आंदोलनकर्त्यांनी मृतदेहाच्या गाडीसह पोलिसांची गाडीही घानवळे मार्गावर रोखली. यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. मात्र, ज्येष्ठ ग्रामस्थांनी मध्यस्थी करत या प्रकरणावर पडदा टाकला. मात्र, आंदोलकर्त्यांनी काँगे्रस तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये व पोलीस पाटील उत्तम पालव यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

Web Title: Army, NCP surrounded forest officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.