मंत्रिमंडळात सेना ‘इन’; जिल्ह्यातील तीनही आमदार ‘आऊट’!

By Admin | Updated: January 3, 2015 00:13 IST2015-01-02T23:11:09+5:302015-01-03T00:13:53+5:30

या तिघांनाही ‘मातोश्री’ ‘आऊट’ करणार, याबाबत चर्चेला आता उधाण आले आहे.

Army 'IN' in Cabinet; Three MLAs in the district 'out'! | मंत्रिमंडळात सेना ‘इन’; जिल्ह्यातील तीनही आमदार ‘आऊट’!

मंत्रिमंडळात सेना ‘इन’; जिल्ह्यातील तीनही आमदार ‘आऊट’!

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना ‘इन’ झाल्यानंतर जिल्ह्यातील सेनेच्या तीनपैकी एकाही आमदाराला लाल दिव्याची गाडी मिळाली नाही. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित २ राज्यमंत्रीपदांमध्ये समावेश होईल व पालकमंत्रीपदही मिळेल, अशी अपेक्षा असतानाच राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना रत्नागिरीचे पालकमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील तीन आमदारांपैकी एकजण मंत्रिमंडळात ‘इन’ होणार की, या तिघांनाही ‘मातोश्री’ ‘आऊट’ करणार, याबाबत चर्चेला आता उधाण आले आहे.
अलिकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात सेनेचे तीन उमेदवार विजयी झाले. हे तीनही आमदार त्यांच्या पातळीवर सेनेतील दिग्गज मानले जातात. राजापूरचा गड सांभाळणारे राजन साळवी यांचे नाव जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करीत असल्याने राज्यभरात ओळखीचे आहे. चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांची दुसरी टर्म आहे. त्यांचाही सेनेत चांगलाच दबदबा आहे. रत्नागिरी हा मतदारसंघ अनेक वर्षे भाजपाकडे आहे. मात्र, युती तुटल्याने राष्ट्रवादीतून अचानकपणे सेनेत प्रवेश करीत माजी राज्यमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीचा किल्ला लढवित सर केला. त्यामुळे या तिघांनाही आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपद मिळण्याची आशा आहे.
मात्र, या तिघांनाही बाजूला ठेवत खेडमधील रामदास कदम यांच्या ‘कदमा’पर्यंत लाल दिव्याची गाडी पोहोचली. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही सेना आमदारांच्या राज्यमंत्रीपद मिळण्याच्या आशा धुळीला मिळाल्या. राज्य मंत्रिमंडळात सेनेच्या कोट्यातील आणखी दोन राज्यमंत्रीपदे भरायची आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे या विस्तारात जिल्ह्याला आणखी एक राज्यमंत्रीपद मिळेल, असा सूर शिवसेनेत पुन्हा आळवला जात आहे. शिवसेनेकडे मंत्रीपदासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे, अन कोट्यातील मंत्रीपदे मात्र केवळ दोन आहेत. या स्थितीत ‘मातोश्री’चा ‘ग्रीन सिग्नल’ या तीनपैकी कोणाला मिळेल का, याचीही चाचपणी सुरू झाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नाही तर नाही निदान राज्यमंत्रीपद तरी मिळेल, अशी या तीनही आमदारांच्या समर्थकांची अपेक्षा असून, ती पूर्ण होणार का, याबाबतचे प्रश्नचिन्ह कायम आहे.
या सर्व प्रकारात जिल्ह्याचे पालकमंत्रीपद व राज्यमंत्रीपद सक्षमतेने सांभाळणाऱ्या उदय सामंत यांची पक्षातील ज्येष्ठतेच्या मुद्द्यावरून झालेली कोंडी फुटणार की नाही, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

मंत्रीपदावरून सेनेत गटबाजी?
जिल्हा शिवसेनेत दोन गट कार्यरत आहेत. त्यामुळे तीनपैकी एका आमदाराला मंत्रीपद दिले, तर ही गटबाजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मंत्रीपद नको, असा विचार करीत तीनही आमदारांना मातोश्रीने आऊट केले की काय, अशीही चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. उदय सामंत हे राष्ट्रवादीत असताना राज्यमंत्री व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री होते. मंत्रीपदावर असतानाच त्यांनी निवडणूक अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेत उडी घेतली व रत्नागिरीची उमेदवारी मिळवित विजयही संपादन केला. सेनेचे धडाडीने कार्य करणाऱ्या व विधानसभा गाजविणाऱ्या साळवी यांची मंत्रीपदाची संधी हुकणार, या शंकेने साळवी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली. साळवी यांना मंत्रीपद मिळावे, अशी समर्थकांची मागणी आहे. दुसरीकडे आमदार सदानंद चव्हाण यांनीही मंत्रीपदासाठी फिल्डींग लावली आहे.

Web Title: Army 'IN' in Cabinet; Three MLAs in the district 'out'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.