मुंबईत उद्या पुरातत्व कार्यशाळा
By Admin | Updated: July 4, 2015 00:14 IST2015-07-03T22:37:24+5:302015-07-04T00:14:17+5:30
विद्यापीठाच्या सेंटर फॉर आर्किआॅलॉजीच्यावतीने आयोजन

मुंबईत उद्या पुरातत्व कार्यशाळा
सिंधुदुर्गनगरी : मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर आर्किआॅलॉजीच्यावतीने रविवारी ( दि. ५) होणाऱ्या दुसऱ्या वार्षिक पुरातत्व शोध मोहीम कार्यशाळेत पुरातत्व अभ्यासक सतीश लळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी व हिवाळे येथील कातळ शिल्पांबाबत शोध निबंध आणि सादरीकरण करणार आहेत. यामुळे सिंधुदुर्गातील कातळ शिल्पांना पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे.
सध्या नाशिक येथे विभागीय माहिती उपसंचालक असलेले सतीश लळीत पुरातत्व शास्त्राचे अभ्यासक असून, ‘रॉक आर्ट सोसायटी आॅफ इंडिया’चे आजीव सदस्य आहेत. सिंधुदुर्गातील हिवाळे, विर्डी, कुडोपी येथील कातळ शिल्पांचा त्यांनी अभ्यास केला असून, याबाबतचा शोध निबंध त्यांनी २०१२ मध्ये सोसायटीच्या १२ व्या वार्षिक परिषदेत बदामी (कर्नाटक) येथे सादर केला होता.
सध्या ते मुंबई विद्यापीठामध्ये सेंटर फॉर आर्किआॅलॉजीमध्ये पुरातत्व शास्त्राचा अभ्यासक्रम करीत आहेत. या सेंटरतर्फे मुंबई विद्यापीठातील नॅनोटेक्नॉलॉजी बिल्डिं गमध्ये दुसरी वार्षिक पुरातत्व शोध मोहीम कार्यशाळा रविवारी होत आहे. या कार्यशाळेत अनेक संशोधक व अभ्यासक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यशाळेमध्ये लळीत आपला शोधनिबंध सादर करतील व छायाचित्रांसह सादरीकरण करतील. दक्षिण गोव्यातील पणसाईमळ येथे अशीच कातळ शिल्पे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही उपळे, मेर्वी, निवळी येथे अशीच कातळ शिल्पे आढळली आहेत. त्यांच्या अभ्यासातून कोकणच्या प्रागैतिहासिक काळावर प्रकाश पडणार आहे. या कार्यशाळेचे आयोजन सेंटर फॉर आर्किआॅलॉजीचे प्रमुख आणि ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. कुरुष दलाल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
सतीश लळीत
यांचे मार्गदर्शन
पुरातत्व अभ्यासक सतीश लळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी व हिवाळे येथील कातळ शिल्पांबाबत शोध निबंध आणि सादरीकरण करणार आहेत.