शिक्षण संस्थेत मनमानी; संचालकांचा आरोप
By Admin | Updated: June 3, 2015 23:39 IST2015-06-03T22:39:46+5:302015-06-03T23:39:34+5:30
वरवडे पंचक्रोशी शिक्षण मंडळ : सभेतील मंजूर ठरावही इतिवृत्तात न लिहिण्याचा पराक्रम

शिक्षण संस्थेत मनमानी; संचालकांचा आरोप
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण मंडळ! परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारी ही संस्था अध्यक्ष शरद बोरकर यांच्याविरोधातील तक्रारींमुळे चर्चेत आली आहे. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशालाही न जुमानता मनमानी करून सभा आयोजित न करणे, सभा मध्येच गुंडाळणे, सभेत कुणाही सदस्याला बोलू न देणे अशा विविध तक्रारी संचालकांकडून करण्यात येत आहेत.
वरवडे पंचक्रोशी शिक्षण मंडळाने ग्रामीण भागात शाळा काढून सामान्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. या शिक्षण संस्थेतर्फे माध्यमिक विद्यालय वरवडे, भागशाळा खंडाळा व श्रीमती पा. शं. बापट कनिष्ठ महाविद्यालय, खंडाळा अशा तीन विद्यालये चालवली जातात. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बोरकर हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. गेले अनेक दिवस या मंडळाच्या कार्यकारी मंडळामध्ये असंतोष खदखदत आहे. मुख्य म्हणजे अध्यक्ष शरद बोरकर यांच्या एकतर्फी कारभाराविरोधात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे सदस्य मंडळींनी धाव घेतली. आयुक्तांनी त्याविरोधात अध्यक्षांना स्पष्ट निर्देशही दिले. मात्र, तरीही कारभारात सुधारणा होत नसल्याचा आरोप संचालकांकडून केला जात आहे.
सदस्यांनी मांडलेला कोणताही ठराव सभेत संमत झाला तरी त्याची इतिवृत्तात नोंद न करणे, इतिवृत्तात असे ठराव लिहिले जाऊ नयेत, यासाठी ते स्वत:कडेच ठेवणे, शाळा समितीची सभा आयोजित न करणे, विरोधासाठी विरोध करणे, असे अनेक आरोप अध्यक्ष बोरकर यांच्यावर याच शिक्षण संस्थेतील सदस्यांनी केले आहेत.
वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माध्यमिक विद्यालय, वरवडे येथे शिक्षकांच्या नियुक्त्यांना संचालकांनी आक्षेप घेतला आहे. सन २०१४-१५ या वर्षात चार शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. या नियुक्त्या करताना विनाअनुदानित तत्त्वावर करण्यात आल्या असल्या तरी कार्यकारी मंडळाच्या सभेत याबाबतचा कोणताही ठराव करण्यात आलेला नाही.
शाळा समितीची रचनाही अध्यक्ष बोरकर यांनी अवैध पध्दतीने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. १३ जानेवारी २०१५ रोजी याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत संस्थेकडून अहवालही मागवला होता. एवढेच नव्हे; तर २०१४मध्ये गठीत झालेली शाळा समिती २५ डिसेंबर २०१३च्या कार्यकारी मंडळाच्या सभेतील ठरावाप्रमाणे गठीत झाल्याचे अध्यक्ष शरद बोरकर यांनी घोषित केले. मात्र, त्या दिवशीच्या ठरावात जी नावे नमूद करण्यात आली आहेत, त्यातील काही नावांचा विचारच करण्यात आलेला नाही. कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे मार्गदर्शनही मागवले होते. त्यानंतरही फरक पडला नाही. (प्रतिनिधी)
डोनेशन द्या, पण पावती मिळणार नाही...
सन २०१४-१५मध्ये पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालयासाठी अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला डोनेशन देण्याबाबत सांगण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात वर्णी लागावी, यासाठी डोनेशनही दिले. मात्र, त्याची पावती आजतागायत देण्यात आली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे आणि त्याबाबत तक्रार केली आहे.