शंभर कोटींच्या कामांना मंजुरी

By Admin | Updated: July 10, 2014 23:47 IST2014-07-10T23:45:55+5:302014-07-10T23:47:23+5:30

जिल्हा नियोजन समिती सभा : विरोधकांना विकासकामात रस नसल्याचा राणेंचा आरोप

Approval of 100 crores works | शंभर कोटींच्या कामांना मंजुरी

शंभर कोटींच्या कामांना मंजुरी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सन २०१४-१५ या वार्षिक विकास आराखड्यातील १०० कोटी रुपये खर्चाच्या कामांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या बैठकीला एकही खासदार व आमदार उपस्थित नव्हते. सभेचे अध्यक्ष पालकमंत्री नारायण राणे यांनी ‘विरोधकांना जिल्ह्याच्या विकासकामात रस नाही तर त्यांना राजकारणात रस आहे’ अशी टीका सभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली.
उद्योग, बंदरे, रोजगार व स्वयंरोजगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विकासकामांना मंजुरी देताना राणे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जिल्ह्यातील सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
सन २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १०० कोटी रुपये निधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांना मंजूर झाले होते. गतवर्षी ९५ कोटी रुपये मंजूर झाले होते.
यावर्षी त्यात ५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या १०० कोटी रुपये निधीमध्ये महाराष्ट्र अभियानांतर्गत नगरपालिकांच्या विकासकामांसाठी १० कोटी ८८ लाख, अंगणवाडी बांधकाम १ कोटी मंजूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विशेष दुरुस्तीसाठी २ कोटी ३० लाख ६४ हजार मंजूर, लघु पाटबंधारे विभागासाठी १ कोटी ५० लाख, लघु पाटबंधारे सर्वेक्षण ५ लाख, ग्रामपंचायतीच्या जनसुविधेसाठी ३ कोटी २७ लाख ५० हजार, मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधा विशेष अनुदान ३३ लाख ५० हजार, यात्रास्थळांचा विकास ३ कोटी, नाविन्यपूर्ण योजना ४ कोटी ५० लाख, पर्यटनस्थळांचा विकास ४ कोटी, ग्रामीण पाणीपुरवठा नळयोजनांसाठी ६ कोटी १५ लाख १४ हजार, साकव दुरुस्ती १ कोटी ८४ लाख.
ग्रामीण रस्ते दुरुस्तीकरण व नूतनीकरण यासाठी ६ कोटी ३ लाख, इतर रस्ते विकास मजबुतीकरणासाठी ६ कोटी १३ लाख ४६ हजार असा एकूण १०० कोटी निधी वरील विकासकामांवर मंजूर करण्यात आला आहे. यातील दीडपट कामांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत विकासकामांच्या याद्यांवर फारशी चर्चा न होता परस्पर मंजूर झाल्या. सुदन बांदिवडेकर, अंकुश जाधव, एकनाथ नाडकर्णी, पंढरीनाथ राऊळ, श्रावणी नाईक या सदस्यांनी कामांच्या याद्या प्रस्तावित केल्या.
भाजपाचे सदाशिव ओगले, राष्ट्रवादीचे राजू बेग यांनीही काही कामे प्रस्तावित केली. (प्रतिनिधी)
-प्राप्त निधीतून होणारी कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी सर्व विभागांनी कामे गतीने करावीत.
-समिती सदस्यांनी जिल्हा नियोजनमध्ये केलेल्या तरतुदींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
-जेणेकरून त्याचा फायदा कामे करताना होणार आहे.
-जिल्ह्याच्या विकासात अजून कोणती कामे समाविष्ट करता येतील या सूचना जिल्हा नियोजन समितीसमोर सादर करणे गरजेचे आहे.
-जेणेकरून अधिकारी जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकतील.

- जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधी १०० टक्के खर्चाची खबरदारी घ्यावी.
-सिंधुदुर्ग जिल्हा हा विकासात अग्रेसर जिल्हा आहे. त्यामुळे ती शान टिकविणे आवश्यक आहे.
-राज्यात सिंधुदुर्गच्या नावाचा दबदबा कायम राहिला पाहिजे.
-प्रगतीमध्ये पुढे असताना आपण प्रथम क्रमांकावर येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केले.
-तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी केलेल्या सहकार्याबाबत धन्यवाद दिले.

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करा : राणे
गेली २५ वर्षे आपण विधीमंडळात काम करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचे फलित म्हणजे सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न एक लाखापर्यंत पोचले. यापुढे आपण या समितीत असू वा नसू पण सिंधुदुर्गचा विकास थांबता कामा नये. अधिकारीवर्गानेही विकासकामांमध्ये दिलेले सहकार्य महत्वाचे आहे. यापुढेही जिल्ह्याचा विकास होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
खासदार-आमदार अनुपस्थित
गुरुवारी पार पडलेल्या नियोजन समिती सभेत शिवसेना खासदार विनायक राऊत, भाजपचे आमदार प्रमोद जठार, राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर हे उपस्थित नव्हते. त्याशिवाय काँग्रेसचे खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर हेही उपस्थित नव्हते. यातील आमदार केसरकर आणि आमदार विजय सावंत यांनी तर यापूर्वीच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता. तसे त्यांनी जाहीरही केले होते. खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार का? याची उत्सुकता होती. परंतु संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात असल्याने खासदार राऊत आणि खासदार डॉ. मुणगेकरही बैठकीला उपस्थित नव्हते.
राणेंनी केले अभिनंदन
दरम्यान, सध्याच्या नियोजन समितीची ही शेवटची बैठक होती. गेल्यावर्षीच्या म्हणजेच सन २०१३-१४ या आर्थिक वर्षाचा ९५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यापैकी सर्व १०० टक्के निधी खर्च झाला अशी माहिती नियोजन अधिकारी हणमंत माळी यांनी देताच पालकमंत्री नारायण राणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Approval of 100 crores works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.