सातजणांचे अर्ज अवैध
By Admin | Updated: September 30, 2014 00:23 IST2014-09-30T00:22:56+5:302014-09-30T00:23:09+5:30
उमेदवारांची संख्या ३१ : उद्या होणार चित्र स्पष्ट

सातजणांचे अर्ज अवैध
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघांतील ३८ उमेदवारांच्या अर्जांची आज, सोमवारी छाननी झाली. यात कणकवली मतदारसंघातील दोघांचे, तर सावंतवाडी मतदारसंघातील पाचजणांचे अर्ज अवैध ठरले असून, कुडाळमधील सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
१ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत असल्याने या दिवशी लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघातून १३ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले होते. आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत सुजितकुमार सुधाकर तावडे (अपक्ष) व संजय संभाजी पाताडे (भाजप) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे आता कणकवली मतदारसंघातून ११ उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. आज येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी संतोष भिसे, तहसीलदार समीर घारे, आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते, तर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती.
अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या सुजितकुमार सुधाकर तावडे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. तसेच त्यांचा अर्जही अपूर्ण होता. त्यामुळे हा अर्ज अवैध ठरला, तर संजय संभाजी पाताडे यांनी भाजपच्यावतीने डमी अर्ज दाखल केला; परंतु अर्जासोबत एबी फॉर्म नसल्याने तसेच अपक्ष म्हणून दहा सूचक आवश्यक असल्याने त्यांचा अर्जही अवैध ठरविण्यात आला आहे, तर विजय कृष्णाजी सावंत यांनी काँग्रेसच्यावतीने दोन अर्ज भरले होते. मात्र, त्यासोबत पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने ते अर्ज अवैध ठरले आहेत. छाननीवेळी उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही हरकत घेतली नाही. त्यामुळे अर्ज छाननीनंतर कणकवली विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवार रिंगणात उरले आहेत. (वार्ताहर)
४सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यातील पाच उमेदवारांच्या अर्जात त्रुटी निघाल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरविले.
४आज येथील उपविभागीय कार्यालयात सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी पार पाडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार तहसीलदार सतीश कदम, आदींसह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
४सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून १६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यातील विष्णू रामचंद्र जाधव (भारिप), किस्तानो मतोरो (अपक्ष), वासुदेव सखाराम जाधव (बाविपा), आदींचे अर्ज अवैध ठरले, तर केसरकरांसाठी डमी म्हणून अर्ज भरलेल्या पल्लवी केसरकर तसेच राजन तेली यांच्यासाठी डमी म्हणून भरलेला अतुल काळसेकर यांचा अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरला आहे, तर उर्वरित अकराजणांचे अर्ज वैध ठरले आहेत.
४१ आॅक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. कुडाळ मतदारसंघातील नऊ उमेदवारांनी सोळा अर्ज दाखल केले होते; मात्र त्यांचे डमी अर्ज अवैध ठरले असले तरी नऊही उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत.
उद्या चित्र स्पष्ट होणार
१ आॅक्टोबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून, ११ उमेदवारांपैकी कोण आपला अर्ज मागे घेतो ? हेही तितकेच औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.