कणकवलीतून नऊ जणांचे उमेदवारी अर्ज
By Admin | Updated: September 28, 2014 00:15 IST2014-09-28T00:15:07+5:302014-09-28T00:15:07+5:30
काँग्रेसतर्फे शक्तीप्रदर्शन, नारायण राणेंची उपस्थिती

कणकवलीतून नऊ जणांचे उमेदवारी अर्ज
कणकवली : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कणकवली मतदारसंघातून नऊ जणांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत कणकवली मतदारसंघातून एकूण तेरा जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
शनिवारी भाजपातर्फे आमदार प्रमोद शांताराम जठार, कॉँग्रेसकडून नीतेश नारायण राणे, शिवसेनेकडून सुभाष विठ्ठल मयेकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून अतुल सुरेश रावराणे, बसपाकडून चंद्रकांत आबाजी जाधव यांनी अर्ज दाखल केले. संजय संभाजी पाताडे यांनी भाजपाकडून डमी अर्ज दाखल केला. त्याचबरोबर सुजित सुधाकर तावडे, विश्वनाथ विष्णू पडेलकर, डॉ. अभिनंदन नीळकंठ मालंडकर यांनी अर्ज दाखल केला.
शुक्रवारपर्यंत भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे डॉ. तुळशीराम रावराणे आणि विजय श्रीधर सावंत, आमदार विजय कृष्णाजी सावंत, सुनिल सदाशिव सरवणकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. यामुळे एकूण १३ जणांचे १९ अर्ज दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)
वेळेनंतर अर्ज नाकारला
वैभववाडी तालुक्यातील करूळ येथील संतोष सावंत यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी अनामत रक्कम भरली होती. मात्र, अॅफिडेव्हिटमधील माहिती चुकीची भरल्याचे निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांनी दुरूस्ती करण्यासाठी कागदपत्र मागे घेतले. पुन्हा कागदपत्र घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाईपर्यंत ३ वाजून १० मिनिटे झाल्याने त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही. त्यांची अनामत परत केली जाणार आहे.