शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन
By Admin | Updated: July 3, 2014 23:58 IST2014-07-03T23:56:27+5:302014-07-03T23:58:25+5:30
घरची परिस्थिती हलाखीची : चौकुळ बेरडकी येथील बालक

शस्त्रक्रियेसाठी मदतीचे आवाहन
आंबोली : चौकुळ म्हाराटवाडी बेरडकी येथील बेरड समाजातील बारावर्षीय बालक गंगाराम प्रकाश नाईक याच्या हृदयाला दोन छिद्रे असून तातडीने शस्त्रक्रिया करणे अतिशय गरजेचे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याच्या वडिलांना शस्त्रक्रियेचा खर्च करणे अशक्य आहे. त्यामुळे विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्तींनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गंगाराम नाईक हा बालक इयत्ता सहावीत शिकत असून तो दोन महिन्यांचा असल्यापासून त्याच्या हृदयावर दोन छिद्रे आहेत. त्याचे वडील प्रकाश नाईक मोलमजुरी करून कुटुंबाचा निर्वाह चालवितात. घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने तसेच कुणाचे मार्गदर्शन नसल्याने गंगारामचे दुखणे वाढतच आहे. गंगारामची शाळाही घरापासून तब्बल दोन किलोमीटर दूर असल्याने शाळेत जाऊन येईपर्यंत त्याला प्रचंड दम लागतो. त्यामुळे वडिलांनी त्याची शाळा बंद केली आहे. छोट्या गंगारामलाही आता आपल्या आजारपणाची जाणीव होऊ लागली असून सामान्य मुलांप्रमाणे मौजमजा, खेळता-बागडता येत नसल्याने तो सदैव हताश असतो. त्यामुळे त्याचे बालपणच हरवत चालले आहे. आंबोलीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर गंगारामच्या वैद्यकीय तपासणीचा खर्च उललला असून आणखीही मदत गोळा करण्याचे आश्वासन दिल्याने एक अंधुकसा आशेचा किरण दिसू लागला आहे. गंगारामच्या शस्त्रक्रियेवरील खर्चात ज्यांना सढळ हस्ते मदत करावयाची असेल, त्यांनी काका भिसे (आंबोली) व सुनील बांदेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)