विघ्नसंतोषी लोक गैरसमज पसरवितात
By Admin | Updated: December 1, 2014 00:12 IST2014-11-30T23:03:29+5:302014-12-01T00:12:00+5:30
राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांचा आरोप

विघ्नसंतोषी लोक गैरसमज पसरवितात
सावंतवाडी : गेले चार दिवस दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळात सुरू असलेल्या वादाप्रकरणी शांत असलेल्या संस्थेच्या कार्याध्यक्षा तथा राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांनी प्रथमच जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे. काही विघ्नसंतोषी लोक द्वेषापोटी आमच्याबद्दल गैरसमज पसरवीत असून, त्यांना वेळीच बाजूला केल्याने ते दुखावले आहेत, अशी टीका करीत आपली भूमिका स्पष्ट केली.
दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचा ताबा मिळविण्यासाठी व नवीन नियामक मंडळ स्थापन करण्याच्या प्रकाराचा निषेध म्हणून आज, रविवारी पंचम खेमराज महाविद्यालयात नागरिक तसेच माजी विद्यार्थ्यांची सभा झाली. यावेळी राजमाता सत्त्वशीलादेवी यांनी आपली भूमिका पत्रकाद्वारे विषद केली.
या पत्रकाद्वारे राजमाता यांनी सांगितले की, ही वास्तू राजघराण्याचे स्वप्न होते. सावंतवाडी परिसरातील खेड्यातील सर्व विद्यार्थ्यांनी येऊन शिकावे, हा यामागचा उद्देश होता. बुद्धिमता असूनही शिक्षण घेणे ज्यांना शक्य नाही, अशांना या संस्थेतून शिक्षण दिले जात असे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षणात अव्वल होईल आणि राजघराण्याचा नावलौकिक होईल, असे नेहमी श्रीमंत शिवरामराजे भोसले यांना वाटत असे. हा शिक्षणाचा वारसा आम्ही नेहमीच निभावला आणि यापुढे निभावत नेऊ, तो येथील सुज्ञ जनतेमुळेच.
मात्र, आज काही विघ्नसंतोषी, स्वार्थी आणि हितसंबंध दुखावलेले, आमच्या हेतूबद्दल गैरसमज पसरवीत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडचणी निर्माण करू पाहत आहेत. त्यांची ही बुद्धी विकृत अशीच आहे. त्यांनी शिक्षणात अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र समाजातील सर्व नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि या प्रवृत्तीचा निषेध केला. या जोरावरच आम्ही शिक्षणाची वेगवेगळी दालने उभी करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. असाच पाठिंबा यापुढच्या काळातही द्या, असे आवाहनही त्यांनी या निवेदनातून केले आहे. (प्रतिनिधी)