कुडाळ : सध्या उद्धवसेना पक्षात चाललेल्या घडामोडी पाहता सामान्य शिवसैनिकांना न्याय देणे, त्यांची कामे करणे अशक्य असल्याने जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच आपली पुढील भूमिका आंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार, असेही जाहीर केले. दरम्यान, कोकणात उद्धवसेनेला एकामागून एक राजकीय धक्के बसत असल्याचे चित्र कायम आहे.कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहावर संजय पडते यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. यावेळी उपविभागप्रमुख सचिन गावडे, काशीराम घाडी, विकास घाडी, किशोर तांबे, भास्कर गावडे, गुरुनाथ गावडे, गुरुनाथ चव्हाण, गणपत चव्हाण आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.पडते यांनी दिलेल्या राजीनामापत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम माझ्या हातून होईल अशी परिस्थिती नाही. आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम केले. सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींमुळे काम करणे शक्य वाटत नाही. यासाठी मी माझ्या जिल्हाप्रमुख या पदाचा राजीनामा देत आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून, भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहीन. आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला ऋणी आहे, असे राजीनामापत्रात म्हटले आहे.
लोकांचा विकास होणे आवश्यकयावेळी पडते यांनी सांगितले की, लोकांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्तेच्या प्रवाहात राहणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे कुठे जायचे हा निर्णय आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा झाल्यानंतर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार आहे. आपण बाळासाहेबांचा शिवसैनिक असून भविष्यात बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत राहीन.