नारायण राणेंना आणखी एक धक्का
By Admin | Updated: September 24, 2014 00:09 IST2014-09-23T21:59:17+5:302014-09-24T00:09:39+5:30
चंद्रकांत देशपांडे यांच्यासह अनेकजण शिवसेनेच्या वाटेवर

नारायण राणेंना आणखी एक धक्का
रत्नागिरी : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासह शिवसेना सोडून काँग्रेसवासी झालेले चंद्रकांत देशपांडे यांच्यासह राजापूर तालुक्यातील अनेक राणेसमर्थकांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. हे सर्वजण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. कोकणचे नेते नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या समर्थकांनी एक-एक करून काँग्रेसला रामराम करण्यास सुरूवात केली आहे. माजी आमदार गणपत कदम आणि सुभाष बने यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवबंधन स्वीकारले आहे. आता त्यांच्या पाठोपाठ राजापूर तालुक्यातील आणखी काही राणेसमर्थक शिवसेनेच्या वाटेवर आहेत.
१९९५ ते ९९ या काळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद सांभाळणारे प्रा. चंद्रकांत देशपांडे राणे यांच्यासमवेतच काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. काँग्रेसमध्ये जिल्हा प्रवक्ते म्हणून ते कार्यरत होते. ते आणि त्यांच्यासमवेत अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
राणे यांच्याशी जवळीक असणाऱ्या दोन माजी आमदारांपाठोपाठ आता त्यांच्याशी जवळीक असलेले पदाधिकारीही एक-एक करून लांब होऊ लागले आहेत. हा राणे यांच्यासाठी धक्का ठरणार आहे.
जिल्ह्यात राजापूर मतदार संघात काँग्रेसची ताकद आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तेथेच मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. अर्थात हे जाणारे लोक कधी आमचे नव्हतेच, अशी भूमिका आता घेतली जात आहे. (प्रतिनिधी)
...तेथे आमचे काय?
नारायण राणे यांच्यासारख्या सक्षम नेत्याला जर काँग्रेसमध्ये त्रास होत असेल, तर आपल्यासारख्या सामान्य पदाधिकाऱ्यांना कोण विचारणार, अशा भावनेतून राणेसमर्थकांनी काँग्रेस सोडण्यास सुरूवात केली आहे. येत्या काही दिवसात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.