तहसीलदारांवर आणखी एक गुन्हा

By Admin | Updated: September 28, 2015 23:46 IST2015-09-28T21:54:29+5:302015-09-28T23:46:23+5:30

गुरुनाथ हुन्नरे : नोंदीत फेरफार केल्याचा आरोप

Another crime against Tehsildars | तहसीलदारांवर आणखी एक गुन्हा

तहसीलदारांवर आणखी एक गुन्हा

राजापूर : शासकीय अधिकाराचा गैरवापर करत वारस नोंदीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्याप्रकरणी ओणी सजाचे तलाठी, मंडळ अधिकारी तसेच राजापूर तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच लाच प्र्रकरणात अडकलेल्या तहसीलदार हुन्नरे यांच्याविरोधात आता आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे.ओणी येथील रामचंद्र हरीश्चंद्र गोरूले व मानू तानू गोरूले यांची सामाईक मिळकत असून, या मिळकतीपैकी सामाईक घर क्र. २६८व जमीन गट क्र.४४४।४४९। ४।२५।४५४।४१०।३२८।१९५।११९अ।९ब।४७९।४०४ या मिळकतींच्या वारस नोंद फेरफारमध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचे रामचंद्र गोरूले यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी दि. १२ डिसेंबर २०१३ रोजी फिर्याद दाखल करून मानू गोरूले यांच्यासह ओणी तलाठी एस. एस. गांधी, मंडल अधिकारी सुरेश गांधी व तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.आपल्या शासकीय अधिकाराचा गैरवापर करत फिर्यादी रामचंद्र गोरूले यांची फसवणूक केल्याप्रकरणी राजापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्यासह मानू गोरूले यांच्याविरोधात क्रीमीनल प्रोव्हीसर कोड कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश राजापूर पोलिसांना दिले आहे. त्यानुसार राजापूर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे यांना नुकतेच दोन लाखाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.राजापुरातील महसूल प्रशासनाचे अनेक कारनामे आता हळूहळू बाहेर येत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वस्तुनिष्ठ व निर्भिडपणे सत्य बाजू मांडली होती. तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांना लाचप्रकरणात अटक झाल्यानंतर आता त्यांच्याविरुध्द आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. राजापुरातील भोळ्या भाबड्या जनतेच्या अज्ञानीपणाचा गैरफायदा घेऊन प्रशासनाकडून त्यांना लुबाडण्याचे काम गेले अनेक दिवस सुरु आहे. (प्रतिनिधी)

ओणीतील ग्रामस्थांच्या सामाईक मिळकतीत केला घोळ.
मिळकतीची वारस नोंद फेरफारमध्ये बेकायदेशीर बदल झाल्याचे निष्पन्न.
राजापूर महसूल प्रशासनाचे एकेक कारनामे उघड.
लोकमतने केला होता वारंवार पाठपुरावा.

Web Title: Another crime against Tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.