ओटवणे देवांच्या मूर्तींना सूर्यकिरणांचा अभिषेक
By Admin | Updated: October 23, 2014 00:03 IST2014-10-22T22:51:03+5:302014-10-23T00:03:30+5:30
४५० वर्षांपूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाच्या परंपरेत सूर्यकिरण अभिषेक सोहळा

ओटवणे देवांच्या मूर्तींना सूर्यकिरणांचा अभिषेक
ओटवणे : येथील जागृत देवस्थान श्री देवी सातेरी रवळनाथ पंचायतन देवस्थानातील देवीच्या मूर्तीला दिवाळीदिवशी सूर्यकिरणांचा अभिषेक अर्पण करण्यात आला. सावंतवाडी राजेशाही संस्थानापासून रूढ झालेली ही धार्मिक परंपरा आजही जपली जाते. सुमारे ४५० वर्षांपूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाच्या परंपरेत सूर्यकिरण अभिषेक सोहळा ओटवणे पंचायतन देवस्थानात महत्त्वाचा मानला जातो. फक्त दिवाळीदिवशी आरशाने सूर्याची किरणे परावर्तित करून हा सूर्यकिरणांचा अभिषेक येथील मूर्तींना अर्पण केला जातो. या दिवशी सर्व गावातील भाविक ग्रामस्थ उपस्थित राहून मंदिरातील मूर्तींना तेल लावून अभ्यंगस्रान घालतात. यानंतर गाव मानकरी आणि दैवी सेवकांच्या उपस्थितीत, ढोलताशांच्या वाद्यात दैवी मूर्तींना सूर्यकिरणाभिषेक अर्पण करण्यात येतो. यावेळी दैवी मूर्तीचे तेजस्वी असे विलोभनीय रूप भाविकांना पहायला मिळते. सूर्यकिरणांच्या अभिषेकात गावचे आराध्य दैवत श्री देव रवळनाथचे तेजस्वी रूप पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. देव रवळनाथला अभ्यंगस्रान घातल्यानंतर अंग पुसण्यासाठी किरणाच्या रुपाने साक्षात सूर्यदेवच श्री रवळनाथाच्या सेवेसाठी उपस्थित असतो, अशी काहीशी प्रतिमा या अभिषेकात उभी राहते. श्री देव रवळनाथाची मूर्ती स्वयंभू आहे. आधी समुद्र, मग कासव, कासवावर पाच फणांचा नाग, नागावर शिवलिंग असून त्यावर रवळनाथाची पाषाणी मूर्ती आहे. अशा स्वयंभू मूर्तीवर सूर्यकिरणांचे तेज पडल्यानंतर मूर्तीची जागृत धार्मिकता लक्षात येते.
पंचायतन देवस्थानातील रवळनाथ, सातेरी, भगवती, महादेव, वेताळ, क्षेत्रफळ, पावणाई, म्हारींगण या मंदिरातील मूर्तींना सूर्यकिरणांचा अभिषेक अर्पण केला जातो. या दिवशी रवळनाथाच्या मंदिराचा गाभा साक्षात सूर्यदेवाने प्रज्वलित केलेला दिसतो. सूर्यकिरणांंनी रोषणाई निर्माण होऊन मंदिरात दिवाळीच साजरी होते. सूर्योदय आणि सूर्यास्ताची किरणे श्री देव रवळनाथाच्या चरणी पडतील, अशी अद्भूत रचना या मंदिराची आहे. ग्रामदैवत श्री देव रवळनाथासह पंचायतन देवस्थानातील सर्व मंदिरातील मूर्तींवर सूर्यकिरणांचा अभिषेक होईल, अशी चौफे र रचना येथील प्रत्येक मंदिराची केलेली आहे. ढोलताशांच्या वाद्यात आणि पुरोहित ब्राम्हणांच्या मंत्रघोषात हा सूर्यकिरण अभिषेक सोहळा पूर्ण केला
जातो. (प्रतिनिधी)