सी वर्ल्डबाबतची भूमिका जाहीर करा

By Admin | Updated: July 28, 2015 21:39 IST2015-07-28T21:39:17+5:302015-07-28T21:39:17+5:30

मंदार केणी : शिवसेनेला आवाहन

Announce the role of C world | सी वर्ल्डबाबतची भूमिका जाहीर करा

सी वर्ल्डबाबतची भूमिका जाहीर करा

मालवण : केंद्र व राज्यात भाजप-सेना सरकार अपयशी ठरले आहे. वाळूप्रश्न, सी-वर्ल्ड, पारंपरिक मच्छिमारांचे प्रश्न सोडवतो असे सांगून जनतेची फसवणूक केली आहे. स्थानिक आमदार सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत जाहीर भूमिका घेत नाहीत.
सी -वर्ल्ड प्रकल्प रद्द करू असे म्हणणारे आमदार आरसे महालात लपून बसतात, अशी टीका काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर केली. तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. तालुक्यात शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वेगळी फळी निर्माण करून नारायण राणे व जनतेला अभिप्रेत असे काम करून दाखवेन, असा विश्वास केणी यांनी व्यक्त केला. भरड येथील नारायण राणे संपर्क कार्यालयात सोमवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन आबा हडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, नगराध्यक्ष अशोक तोडणकर, राजन गावकर, अनिल कांदळकर, उमेश मांजरेकर, राजू परुळेकर, संजय लुडबे, संग्राम प्रभुगावकर, राजेंद्र प्रभुदेसाई, छोटू ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

पारंपरिक मच्छिमारांच्या मागे काँग्रेस पक्ष
पारंपरिक मच्छिमारांच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. निवडणूक काळात पारंपरिक मच्छिमार आणि पर्सनेट मच्छिमार वादावर तोडगा काढू असे आश्वासन देऊन मते मागितली होती. पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने शिवसेना नसल्यानेच पारंपरिक मच्छिमारांना अटक झाली. पर्सनेट व्यावसायिकांची बाजू पालकमंत्री दीपक केसरकर उचलून धरतात, तर आपण पारंपरिक मच्छिमारांच्या बाजूने असल्याचे बेगडी प्रेम आमदार वैभव नाईक दाखवत असल्याचा आरोप केणी यांनी केला. मच्छिमारांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठाम उभा राहील. त्यांना लागणारे आर्थिक साहाय्य देण्याबरोबर त्यांच्या पर्ससीनविरोधी लढ्यात आमचे पदाधिकारी सहकार्य करतील. तसेच पर्सनेटला काँग्रेसचा विरोध नाही. अनधिकृत मासेमारी व परप्रांतीय ट्रोलर मासेमारीस आमचा विरोध राहील, अशी भूमिका केणी यांनी मांडली.

वाळूप्रश्नी आवाज उठविणार
तालुक्यात सध्या वाळू प्रश्न हा वाळू व्यावसायिकांच्या जिवावर बेतला आहे. वाळू व्यावसायिकांना जाचक अटी लावून व्यावसायिकांसह जनतेस वेठीस धरण्याचे काम आताचे आमदार, पालकमंत्री करत आहेत. आमदारांनी प्रशासनासमोर डंपरमध्ये वाळू भरून आंदोलन केले. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र, वाळू व्यावसायिकांना पाचपट दंड आकारण्यात येतो. याप्रश्नी काँग्रेस आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Announce the role of C world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.