बुद्धीबळ स्पर्धेत अनिकेत वेंगुर्लेकरचे यश
By Admin | Updated: August 21, 2014 00:25 IST2014-08-20T21:11:40+5:302014-08-21T00:25:00+5:30
खर्डेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी : साताऱ्यातील विभागीय स्पर्धेसाठी निवड

बुद्धीबळ स्पर्धेत अनिकेत वेंगुर्लेकरचे यश
वेंगुर्ले : ओरोस जिल्हा क्रीडा संकुल येथे नुकत्याच पार पडलेल्या शासकीय महाविद्यालयीन जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत वेंगुर्लेतील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत प्रदीप वेंगुर्लेकर या आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूने पाच फेऱ्यांतील पाच पैकी पाच गुण मिळवित विजेतेपद प्राप्त केले. त्याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अनिकेत वेंगुर्लेकर याने पांढऱ्या मोहरा घेऊन खेळताना ई-४ तर काळ्या मोहरा घेऊन खेळताना सिसिलियन डिफेन्सचा प्रभावी वापर करून हे यश संपादन केले. या जिल्हास्तरीय शालेय-महाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक कणकवली कॉलेजच्या शैलेश तेंडोलकर (साडे चार गुण), तृतीय क्रमांक देवगड कॉलेजचा सचिन चव्हाण (चार गुण), चौथा क्रमांक कणकवली कॉलेजचा भूषण घाडी, तर पाचवा क्रमांक फोंडाघाट कॉलेजच्या नुपूर सावंत यांनी प्रगत गुणांच्या जोरावर पटकाविले.
या पाचही खेळाडूंची निवड सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्तरांसाठी झाली आहे. या स्पर्धेत २९ स्पर्धक सहभागी झाले असतानाही बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या अनिकेत प्रदीप वेंगुर्लेकर याला बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ प्रशिक्षक काशिनाथ मंगल (कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभल्याने त्याने विजेतेपद लाभल्याचे स्पष्ट केले.
त्याच्या या नेत्रदीपक कामगिरीबद्दल लायन्स क्लबचे सिंधुुदुर्गातील उपप्रांतपाल अजित फाटक, अॅड. अजित भणगे, डॉ. प्रल्हाद मणचेकर, सर्व लायन्स तसेच रोटरी क्लबचे सचिव राजन गिरप, माजी अध्यक्ष संजय पुनाळेकर, बॅ. खर्डेकर, कॉलेजचे प्राचार्य सिध्दार्थ फडतरे, सर्व प्राध्यापक, विरेंद्र देसाई, सुरेंद्र चव्हाण यांनी अनिकेत वेंगुर्लेकर व इतर विजेत्यांचे अभिनंदन केले
आहे. (प्रतिनिधी)