देवगडमध्ये अंगणवाडी सेविकांचा मोचा
By Admin | Updated: January 13, 2015 00:05 IST2015-01-12T22:30:21+5:302015-01-13T00:05:10+5:30
मे महिन्याचे मानधन कापल्याचा निषेर्ध

देवगडमध्ये अंगणवाडी सेविकांचा मोचा
पुरळ : अंगणवाडी सेविकांचे मे महिन्याचे अकारण कापलेले मानधन व्याजासह तातडीने द्यावे आदी मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा संघटनेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली देवगड येथील तहसील कार्यालयातील बालविकास सेवा योजना कार्यालयावर धडकला.मोर्चात तालुक्यातील अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यावेळी कमलताई परुळेकर यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी जयप्रकाश परब यांना सेविकांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये अंगणवाडी सेविकांचे मे महिन्यातील अकारण कापलेले मानधन व्याजासहीत परत मिळावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी जनश्री विम्याचा हप्ता शासन भरत असते. परंतु या कार्यालयाकडून त्याबाबत पाठपुरावा होत नसल्याने मृतांना मृत्यू दावे मिळत नाही व लाभार्थ्यांच्या नववी ते बारावी व आयटीआयच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही याकडेही लक्ष वेधले.
अंगणवाडी सेविकांच्या अतिरिक्त कामाचा अतिरिक्त मोबदला पुर्वलक्षी प्रभावाने द्यावा, मदतनीस किंवा मिनी सेविका यांना अतिरिक्त कार्यभार देऊ नये, देवगड तालुक्यात अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागा न भरल्याने एकाच कर्मचाऱ्यावर ताण पडत असून अशा रिक्त जागा तीन महिन्यांच्या आत भराव्यात, टीए, डीए, आहार बिले तातडीने द्यावीत, अंगणवाडीची बदललेली वेळेबाबत मुख्य सेविका कल्पना देत नाहीत त्यामुळे जादा तास काम अंगणवाडी सेविकांकडून करून घेतले जाते. त्याचा मोबदला मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी अंगणवाडी सेविका संघटनेच्या तालुकाध्यक्षा शालिनी तारकर, सचिव उल्का बिर्जे, शरयू हिर्लेकर, शैलजा घाडी, सुरभी पुरळकर, पार्वती नर आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)