अंगणवाडीतील मुलांना धोका

By Admin | Updated: September 29, 2014 00:02 IST2014-09-29T00:01:19+5:302014-09-29T00:02:35+5:30

हुमलेटेंब शाळा : शाळेच्या फरशीखाली विंचू, सरपटणारे प्राणी

Anganwadi children are at risk | अंगणवाडीतील मुलांना धोका

अंगणवाडीतील मुलांना धोका

कनेडी : कणकवली तालुक्यातील नाटळ हुमलेटेंब शाळेच्या अंगणवाडी वर्गातील फरशा पूर्णपणे निखळून आल्या आहेत. या फरशांच्या फटीमध्ये विंचू, सरपटणारे प्राणी यांचा सहवास असल्याने छोट्या मुलांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित खात्याकडे लेखी तसेच तोंडी पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची गंभीरपणे दखल संबंधित खात्याने न घेतल्यास मुलांना शाळेमध्ये पाठविणार नाही असा इशारा पालकांनी दिला आहे.
सह्याद्री पट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये नाटळचा सहभाग आहे. या अंगणवाडीच्या बाजूचा परिसर हा जंगलमय व दलदलीचा आहे. नजीकच तळे आहे. येथे बहुतांश सरपटणारे प्राणी तसेच हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका विद्यार्थ्याला विंचवाने दंश केला होता. त्याचप्रमाणे अंगणवाडीला लागूनच असलेल्या प्राथमिक शाळेच्या एका वर्गात दोन सापांचा रहिवास असल्याचे आढळून आले होते. शिक्षकांनी प्रसंगावधानता राखून विद्यार्थ्यांचा जीव वाचवला होता.
या घटना ताज्या असताना अशाप्रकारचे प्रसंग छोट्या मुलांवर येवू नये यासाठी पालकांनी सावधानतेचा इशारा संबंधित खात्याला दिला आहे.
तळेवाडी, विकासवाडी, हुमलेटेंब या तीन वाडीतील मुले या अंगणवाडीमध्ये येतात. येथे कार्यरत असलेल्या अंगणवाडी शिक्षिकेने पदाचा राजीनामा दिल्याने हे पद गेले पाच महिने रिक्त झाले आहे. अंगणवाडी सेविकाच अंगणवाडी चालविते. शिक्षिका नसल्याने मुलांच्या शिक्षणाचा व शासन पुरवित असलेल्या सुविधांचा विद्यार्थ्यांना लाभ होत नसल्याचे पालकवर्गातून बोलले जात आहे. अंगणवाडी शिक्षिकेचे पद लवकरात लवकर भरण्यात यावे, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनेची गंभीरपणे दखल संबंधित खात्याने घेऊन वर्गामध्ये नवीन फरशा बसवाव्या. अन्यथा मुलांच्या बैठकीची वेगळी व्यवस्था करावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. (वार्ताहर)
४गेली दोन वर्षे नाटळ हुमलेटेंब शाळेतील समस्येबाबत व्यवस्थापन समिती, शिक्षकांनी लेखी पत्र शिक्षण विभागाला दिले होते. याबाबतची पोचही शाळा व्यवस्थापक अध्यक्षांनी स्वत: निवेदन देऊन घेतली होती. लोकप्रतिनिधींनाही यासंबंधी कळविण्यात आले होते. परंतु सर्वांनीच या घटनेची दखल घेतली नाही. याबाबत पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाठपुरावा करुनही संबंधीत या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत.

Web Title: Anganwadi children are at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.