अन् मुलीची आईशी भेट झाली
By Admin | Updated: October 6, 2014 22:36 IST2014-10-06T21:34:20+5:302014-10-06T22:36:24+5:30
दुसरी बस पकडायची घाई असल्याने आई एसटीमधून खाली उतरली

अन् मुलीची आईशी भेट झाली
सावंतवाडी : नेतर्डे येथून सावंतवाडीत आलेल्या एसटी बसमध्ये दोन वर्षाची एक मुलगी पालकांशिवाय आढळून आली. तिच्यासोबत कोणीही नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. चौकशीअंती ती मुलगी चुकून गाडीतच राहिल्याचे लक्षात आले. त्यानंतर बऱ्याच वेळाने त्या मुलीची आई बांदा येथून मुलीला शोधत सावंतवाडी बसस्थानकात दाखल झाली आणि ताटातूट झालेल्या आईची आणि मुलीची भेट झाली.ही घटना सोमवारी दुपारी घडली. दोन वर्षांची मुलगी स्रेहा सावंत आणि तिची आई (दोघे रा. मुंबई) काही दिवसांपूर्वीच सरमळे गावी आल्या होत्या. स्नेहाच्या आईचे माहेर सरमळे असून सासर तळकट येथे आहे. सोमवारी सकाळी स्नेहाला घेऊन तिची आई सरमळे येथून तळकटला निघाली होती. त्या नेतर्डे-सावंतवाडी एसटी बसमधून बांदा येथे आल्या. मात्र, बांदा येथे येताच दुसरी बस पकडायची घाई असल्याने स्नेहाची आई एसटीमधून खाली उतरली. धावपळीत तिने आपल्यासोबतचे सामान खाली उतरवले. आणि मुलगी आपल्यासोबतच खाली उतरली असेल असे मानतच एसटीतून खाली उतरली. त्यानंतर लगेचच एसटी सावंतवाडीच्या दिशेने निघून गेली. आणि स्नेहाच्या आईला स्नेहा गाडीतच राहिल्याचे लक्षात आहे. दरम्यान, ती मुलगी एसटीतून सावंतवाडी स्थानकात आली. मात्र, तिच्यासोबत कुणीच नसल्याचे पाहून एसटीचे चालक व वाहकही विचारात पडले. त्यांनी एसटी प्रशाननाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना ही गोष्ट सांगितली.
मुलीचे काय करायचे, हा प्रश्न एसटी कर्मचाऱ्यांना पडला असतानाच, स्नेहाची आई शोधाशोध करत सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. तिने आपल्या मोबाईलमधील मुलीचे फोटो दाखवत मुलगी आपली असल्याचे सांगत मुलीला मिठीच मारली. आणि अखेर आईची व मुलीची भेट झाली. मात्र, या साऱ्या प्रकारामुळे सावंतवाडीतील एसटी स्थानकावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)