अमितच्या घातपाताचा संशय
By Admin | Updated: May 7, 2016 00:41 IST2016-05-07T00:33:11+5:302016-05-07T00:41:19+5:30
चौकशीने ओटवणे पंचक्रोशीत खळबळ : पत्नीने दिली पंधरा संशयितांची नावे

अमितच्या घातपाताचा संशय
ओटवणे : ओटवणे नदीपात्रात २३ एप्रिल रोजी बुडून मृत्यू पावलेल्या ओटवणे-गावठणवाडी येथील नारायण उर्फ अमित गावकर यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागत आहे. अमितची पत्नी आर्या गावकर यांनी पंधरा संशयित आरोपींची नावे पोलिसांना दिली असून, पोलिसांमार्फत त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, हे पंधरा संशयित अमितचेच सहयोगी मित्र असून, चौकशीमुळे त्यांचे धाबे दणाणले आहे.
२२ एप्रिल रोजी दुपारी कामावरून अचानक परतलेला अमित सायंकाळी गायब झाला होता. शनिवारी दुपारी त्याचा मृतदेह ओटवणे नदीतील मोठ्या पूलानजीक तरंगताना दिसला. अमित गावकर हा पोहण्यात कुशल होता. त्यामुळे अमितचा पाण्यात बुडून मृत्यू होण्यामागे नक्कीच घातपात असल्याचा संशय कुटुंबीयांनी सुरूवातीपासून व्यक्त केला होता. शिवाय त्याच्या मृत्यूमागची अनेक कारणेही अस्पष्ट असल्याने हे प्रकरण पंचक्रोशीत चांगलेच चर्चिले गेले.
जर अमितला आत्महत्या करायची होती, तर त्याने कपडे का उतरवून ठेवले? एवढी मोठी नदी असताना दररोजची मासेमारीचीच जागा आत्महत्येसाठी का निवडली? अमित कामावरून आत्महत्या करण्यासाठीच आला होता की आणखी काही? ज्या दिवशी मृतदेह आढळला, त्या दिवशी त्याने उतरवून ठेवलेले कपडे सापडत नाहीत व अचानक दोन दिवसांनंतर कपडे कसे सापडतात? त्याचा बुडून मृत्यु झाला तर त्याच्या शरीरावर असलेल्या खुणा नेमक्या कशाच्या? तसेच शवविच्छेदन तपासात त्याचा मृत्यू जरी बुडून झाला असला, तरी त्याच्या मानेवर, दातांवर झालेल्या आघाताविषयी कुटुंबाने संशय व्यक्त केला आहे.
या संशयातूनच अमितच्या कुटूंबियांकडून त्याचा घातपात केल्याची तक्रार देण्यात आली आहे. तर अमितची पत्नी आर्या गावकर हिने अमितच्या मृत्युप्रकरणी अमितच्या १५ मित्रांची संशयित म्हणून नावे दिली आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून, पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. (प्रतिनिधी)
तो विजय कोण ?: पोलिसांना करावा लागणार तपास
अमितचा मृत्यू झाल्यानंतर आठवडाभरानंतर ‘विजय’ नामक व्यक्तीचा अमितची पत्नी आर्या हिला फ ोन आला होता व आपल्याशी फेंडशिप करशील का, अशी त्याने विचारणा केली होती. हा फोन मुंबई नालासोपारा ते विरार या दरम्यानचा असल्याने ही विजय नामक व्यक्ती कोण? असा प्रश्न उपस्थित होतआहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. अमितबरोबर शुक्रवारी सायंकाळी दिसलेली ती अनोळखी व्यक्ती ‘विजय’ नसेल ना, याबाबतही आता पोलिसांना तपास करावा लागणार आहे.