संयुक्त पंचनाम्यासह होणार सुधारित याद्या
By Admin | Updated: December 30, 2015 00:33 IST2015-12-29T22:16:16+5:302015-12-30T00:33:56+5:30
शासनाचे आदेश : आंबा, काजू भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा ?

संयुक्त पंचनाम्यासह होणार सुधारित याद्या
प्रकाश काळे-- वैभववाडी -कोकणातील शेतकऱ्यांना आंबा, काजू नुकसानभरपाई हमीपत्रावर देण्यासाठी सामायिक क्षेत्रातील लागवड कोणाची आहे. याबाबत खात्री करुन संयुक्त पंचनाम्यासह आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची सुधारित यादी तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे वाद असतील तिथे संमतीपत्रासह भविष्यात वाद उत्पन्न झाल्यास घेतलेली मदत शासनाला परत करण्यासंबंधी बंधपत्र घेऊनच नुकसान भरपाईचे वाटप करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे संमतीपत्रावर नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी भरपाई पदरात पडण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
फेब्रुवारी, मार्च २0१५मध्ये गारपीट, हवामानातील बदल व अवकाळी पावसामुळे आंबा, काजूपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने राज्य शासनाने आपद्गस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेत भरपाई वाटपाची जबाबदारी महसूलकडे सोपवली होती. मात्र, महसूलने हिस्सेदारांच्या संमतीखेरीज भरपाई देण्यास नकार दिल्याने कोकणातील बहुसंख्य शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले. त्यामुळे नुकसानभरपाईचा निधीही पडून राहिला. याबाबत कोकणातील आमदारांनी हमीपत्रावर भरपाई वाटण्याची शासनाकडे मागणी लावून धरल्याने कोकण विभागासाठी नुकसान भरपाईचा स्वतंत्र शासन निर्णय काढून दिलासा दिला. मात्र, नव्या शासन निर्णयातील अटी शर्थीची पूर्तता करण्यात आणखी दोन महिने लोटणार असल्याचे दिसून येत आहे.
नव्या शासन नियमानुसार पूर्वी नुकसानाचा पंचनामा केलेल्या लागवडी नेमक्या कोणी केल्या आहेत. त्याची खात्री करून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच व लगतच्या वहिवाटदारांच्या स्वाक्षरीने आपद्गस्त कसवटदारांची सुधारित यादी तयार केली जाणार आहे.
तयार केलेल्या या याद्यांचे त्या त्या ठिकाणच्या ग्रामसभेत वाचन करुन ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करून त्यावर १५ दिवसात येणाऱ्या हरकतींच्या निर्गतीचे अधिकार महसूल मंडल अधिकारी, मंडल कृषी अधिकारी यांच्या समितीला देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
सुधारित याद्यांसाठी हालचाली
संमतीपत्राच्या अटीमुळे मे २0१५ मध्ये महसूलकडे प्राप्त झालेला आंबा, काजू नुकसान भरपाईचा निधी पडून आहे. त्यामुळे नव्या शासन निर्णयानुसार आपद्गस्त शेतकऱ्यांच्या सुधारित याद्या तयार करण्यास विलंब होऊन मार्च अखेरीस निधी मागे जाऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महसूलने संबंधिताना कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकांना संयुक्त पंचनाम्यासह सुधारित याद्या तातडीने बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दोन महिन्यांची प्रतीक्षा
समितीने हरकतींवर सुनावणी घेऊन उपलब्ध कागदपत्र व पंचनाम्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. हिस्सेदारांच्या हरकती असतील तेथे संमतीपत्र बंधनकारक केले आहे. भविष्यात नुकसानभरपाईबाबत हिस्सेदारांमध्ये वाद निर्माण झाला तर भरपाईची रक्कम परत करण्याचे बंदपत्र घेऊनच भरपाईचे वाटप होणार आहे. भरपाई देण्याचा सुधारित निर्णय झाला असला तरी मदत पदरात पाडून घेण्यासाठी किमान दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.