आंबोलीतील पर्यटनस्थळांना ‘बुरे दिना’ची झालर

By Admin | Updated: January 2, 2016 08:29 IST2016-01-01T21:13:56+5:302016-01-02T08:29:16+5:30

विकासकामांत साधले जातेय ‘हित’ : स्थानिक केवळ ‘बघेच’; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

Ambali tourist places 'Bad Dinna' flurry | आंबोलीतील पर्यटनस्थळांना ‘बुरे दिना’ची झालर

आंबोलीतील पर्यटनस्थळांना ‘बुरे दिना’ची झालर

आंबोली : थंड हवेचे रमणीय ठिकाण असूनही केवळ अपुऱ्या सोयीसुविधा व पर्यटकांसाठी नसलेले मनोरंजन यामुळे आंबोलीतील पर्यटनाला मर्यादा येत आहेत. हिवाळी पर्यटनासह ख्रिसमसच्या निमित्ताने सिंधुदुर्गसह गोवा राज्यात जाणाऱ्या लाखो पर्यटकांपैकी नाममात्र पर्यटकच आंबोलीत डोकावत आहेत. त्यामुुळे आंबोलीच्या पर्यटनाला अच्छे दिनाऐवजी दिवसेंदिवस ‘बुरे दिना’ची झालर चढत आहे.
आंबोलीत हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेवगड पॉर्इंट, नांगरतास धबधबा, राघवेश्वर स्वयंभू गणपती मंदिर, कावळेशेत पॉर्इंट, धबधबा, शिरगावकर पॉर्इंट यासारखी पर्यटनस्थळे आहेत. सुरुवातीच्या काळात या पर्यटनस्थळांना राज्यातील पर्यटकांसह देशातील पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली होती. नैसर्गिक सौंदर्य आणि रमणीय वातावरण यामुळे आंबोलीच्या पर्यटनाची चांगलीच भुरळ पर्यटकांना पडली होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायही तेजीत येऊन स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दूर झाला होता.
सध्या या पर्यटनस्थळांवरील अनेक सुविधांच्या बाबतीत वानवा आहे. त्यामुळे येथील पर्यटकांना या स्थळांची गोडी कमी होत असून पर्यटक नाराजीने माघारी फिरत आहेत. स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे. शासनाकडून या स्थळांच्या सुधारणेसाठी विविध विकास निधी दिला जातो; पण यातून निर्माण होणारी कामे विकास करण्यापेक्षा भकास होत आहेत. कोणतेही पर्यटन विकासाचे काम सुमार दर्जाचे होत असताना या व्यावसायिकांकडून ते काम कोणते आहे किंवा या कामाचा खरोखर पर्यटनाला काही फायदा होतो का? याबाबतची साधी विचारणाही केली जात नाही. स्थानिकांच्या केवळ बघ्याच्या भूमिकेनेच ठेकेदार व काही अधिकारी आपले यातून ‘हित’ साधून घेतात. त्यामुळे या पर्यटन स्थळांचा विकास रखडलेल्या अवस्थेतच आहे.
याशिवाय आंबोलीत अद्यापही एकही सार्वजनिक शौचालय पर्यटकांसाठी उपलब्ध नाही. तीन पर्यटन स्थळे वगळता इतर पर्यटन स्थळांवर रस्त्याअभावी साधे जाता सुद्धा येत नाही. त्यामुळे काय आहे आंबोलीत, असा प्रश्न विचारत पर्यटक आंबोलीतून काढता पाय घेत आहेत. आंबोलीच्या पर्यटनाचे चांगले दिवस येण्याऐवजी दिवसेंदिवस वाईट दिवस येत असून स्थानिक पर्यटन व्यावसायिक, लोक प्रतिनिधी व पर्यटन महामंडळ यांच्या उदासिनतेमुळे आंबोलीची ही अवस्था झाल्याचे बोलले जात आहेत. स्थानिकांच्या मतानुसार आंबोलीत होणारी पर्यटन विकासकामे ही लोकप्रतिनिधी आणि संबंधित ठेकेदार यांच्या हितासाठीच होत असल्याचे आरोपही होत आहे.

Web Title: Ambali tourist places 'Bad Dinna' flurry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.