आमशेत, कर्जीत मृत मासळीचा खच
By Admin | Updated: November 28, 2014 00:12 IST2014-11-27T23:00:06+5:302014-11-28T00:12:23+5:30
प्रदूषण : प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली

आमशेत, कर्जीत मृत मासळीचा खच
चिपळूण : काळेकुट्ट पाणी आणि मृत माशांचा खाडीकिनारी खच दिसून येत आल्याने तलाठ्यामार्फत पंचनामा करुन प्रांताधिकारी खेड यांची हनिफ परकार यांनी भेट घेतली.
लोटे एमआयडीसी क्षेत्रातील प्रस्थापित रासायनिक कारखानदारीमुळे गेली १७ वर्षे दाभोळखाडी किनारी वास्तव्य करणाऱ्या आणि पूर्णत: मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. या समस्येच्या निराकरणासाठी व्यक्ती, समाज आणि विविध संस्था, संघटना प्रयत्नशील असून, अद्याप प्रदूषण नियंत्रित केले जात नाही.
दाभोळखाडी प्रदूषण मुक्त व्हावी व मच्छिमार बांधवांच्या रोजी रोटीचा प्रश्न सुटावा, याकरिता कर्जी आमशेत (खेड) येथील हनिफ परकार यांनी मुंबई हायकोर्ट येथे २०१० मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. प्रदूषण सिद्ध करणाऱ्या शास्त्रीय पुराव्याअभावी या याचिकेचा अपेक्षित परिणाम मिळाला नाही. अपयशाने खचून न जाता पुन्हा धैर्याने कोर्टात जाण्याची तयारी परकार यांनी केली आहे. दाभोळ खाडीतील जलप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी २०११मध्ये प्रदूषण नियंत्रण समिती, तहसीलदार खेड यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली. परंतु, कारखानदार, एमपीसीबी व सीईटीपी यंत्रणेच्या बेजबाबदार कृतीमुळे परिणाम शून्य झाला. गेल्या वर्षभरामध्ये विद्यमान संनियंत्रण समितीने जी पाहणी केली व पाणी नमुने घेऊन तपासणी केली, त्यामध्ये प्रदूषण नसल्याचे म्हणजे पाण्याचा पी. एच. योग्य असल्याने पाण्याला रंग व वास येत नसल्याचे नमूद केले आहे. पण, प्रत्यक्ष मासे मर्तुकीच्या घटना अनेकदा घडत आहेत.
ज्यावेळी प्रदूषित पाणी खाडीत सोडले जात नाही, अशाच वेळी ही पाहणी आणि नमुने जाणीवपूर्वक घेतले जात आहेत. या यंत्रणेच्या म्हणण्यानुसार तपासणीसाठी पाणी नमुने घेतल्यामुळे पाण्यामध्ये प्रदूषके नसल्याचे व पाण्याला रंग, वास येत नसल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत. हेच अहवाल एमपीसीबीने मुंबई हायकोर्टसमोर सादर केल्यामुळे हनिफ परकार यांनी सुरु केलेल्या न्यायालयीन लढाईसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यांच्या या लढ्याला ताकद देण्यासाठी दाभोळ खाडी परिसरातील जन संघटना, कोकण संघर्ष समिती, विकास मंच, परिवर्तन संस्था, पर्यावरणप्रेमी व तज्ज्ञ एकवटले आहेत. प्रदूषण संनियंत्रण समितीचे पुन्हा संघटन करुन या समितीत अन्य समाज घटक, पर्यावरणप्रेमी, ग्रामपंचायत तसेच जनसंघटनांचे प्रतिनिधी घ्यावेत, अशी विनंती करण्यात आली असून, चिपळूण व खेड प्रांतांनी ती मान्य केली आहे. या प्रदूषण संनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रदूषणाला आळा घालण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. (प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील खाडीपट्टा भागात मासे मरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या प्रकारानंतर मच्छिमार चिंता व्यक्त करीत आहेत.
रासायनिक कारखानदारीमुळे खाडीपट्ट्यातील जनजीवन आर्थिक मंदीच्या छायेखाली.
प्रदूषणाविरोधात संताप व्यक्त करून आंदोलनाचा इशारा.