पालकमंत्री असल्याचे नेहमी भान ठेवा
By Admin | Updated: June 19, 2015 00:25 IST2015-06-18T22:23:51+5:302015-06-19T00:25:50+5:30
परशुराम उपरकर : दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका

पालकमंत्री असल्याचे नेहमी भान ठेवा
कणकवली : कोकणचा विकास करणार असे मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सांगणारे दीपक केसरकर फक्त आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांबाबतच विचार करीत आहेत. ते फक्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नसून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, याचे त्यांनी भान ठेवावे, असा टोला मनसेचे कोकण विभागीय संघटक परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.येथील संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, दया मेस्त्री उपस्थित होते. उपरकर म्हणाले, पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी मंजूर करून आणलेली विकासकामे दीपक केसरकर रद्द करीत आहेत. चिपी विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विकासकामे करून संपूर्ण जिल्ह्याचा विकास केल्याचा आव ते आणत आहेत. चिपी विमानतळ ते गोव्यापर्यंतच्या सागरी मार्गासाठी ११५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे त्यांनी अलिकडेच सांगितले. मात्र मालवण, देवगड, विजयदुर्ग हा भागही सागरी मार्गामध्ये येतो याबद्दल ते काहीही वाच्यता करीत नाहीत. तिंबलोच्या हॉटेलला फायदा मिळावा यासाठी केसरकरांची सर्व धडपड सुरु आहे.
वेंगुर्ले तालुक्यासाठी २५० कोटींची नळयोजना आणणार असल्याचे ते सांगत असले तरी ही योजना नेमकी कोणासाठी आहे हे जनतेला माहित आहे. पूर्वीचे पालकमंत्री जूनमध्ये चिपी विमानतळावर विमान उतरणार असे सांगत होते. मात्र, केसरकर डिसेंबरमध्ये विमान उतरणार असल्याचे सांगतात. ही जनतेची दिशाभूल आहे. जनतेकडून कमी दराने घेतलेली जमीन ८ हजार रुपये गुंठा दराने आयआरबी कंपनीला वापरासाठी देण्यात आली आहे. एलएनटी कंपनीने ५० कोटींचे काम याठिकाणी केले असून आता काम बंद आहे. कारण कामाच्या निविदेमध्ये नमूद करण्यात आलेले काम आता कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीचे नुकसान होणार आहे. विमानतळावरील धावपट्टी ३.४५ किलोमीटरवरून २.५ किलोमीटरवर आणण्यात आली आहे तर पाच विमानांसाठी पार्कींग शेड उभारण्याचे पूर्वी ठरले होते. मात्र, आता ही व्यवस्था दोनच विमानांसाठी होणार आहे. सुरक्षिततेसाठी असलेली कंपाऊंड वॉलही कमी करण्यात आली आहे. सामान्यांसाठी विमानतळाचा काही उपयोग होणार नाही. विमानात बसण्याची सर्वसामान्यांची इच्छा अपूर्ण राहणार असून, तिंबलोसारख्या हॉटेलातील पर्यटकांनाच या विमानतळाचा उपयोग होणार असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)