विषय समिती निवडीत युतीची बाजी

By admin | Published: December 1, 2015 10:46 PM2015-12-01T22:46:44+5:302015-12-02T00:42:57+5:30

राजेश प्रसादी, वंदना कुलकर्णी स्वीकृत : दोडामार्ग नगरपंचायतीत तीन समित्या काँग्रेस आघाडीकडे

The alliance's stake in the selection committee | विषय समिती निवडीत युतीची बाजी

विषय समिती निवडीत युतीची बाजी

Next

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीवेळी केलेल्या चुका सुधारत सेना-भाजप युतीने मंगळवारी एकसंघ राहून कसई दोडामार्ग नगर पंचायतीच्या विषय समित्या निवडीमध्ये वर्चस्व मिळविले. यावेळी चार विषय समित्यांपैकी तीन विषय समित्यांमध्ये युतीचे प्राबल्य राहिले. तर पदसिद्ध असणाऱ्या स्थायी, बाजार समिती व पाणी दोन विषय समित्या काँग्रेसकडे राहिल्या. दरम्यान, नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी काँग्रेस आघाडीमार्फत राजेश प्रसादी तर युतीमार्फत वंदना कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
कसई दोडामार्ग नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक अनेक कारणांनी गाजली. सतरा नगरसेवकांची संख्या असलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीत संख्याबळ अपूर्ण असतानासुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने वन टू का फोर करीत सेना, मनसे व भाजपाच्या प्रत्येकी एका सदस्याचा पाठिंबा मिळवत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद आपल्याकडे खेचून आणले. त्यानंतर आठ दिवसांनी मंगळवारी विषय समित्या व सदस्यांची संख्या ठरविणे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी सर्वप्रथम नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवक ठरविण्याची प्रक्रिया घेण्यात आली. आघाडीकडून राजेश शशिकांत प्रसादी, तर सेना-भाजप युतीकडून डॉ. वंदना सुहास कुलकर्णी यांचे नाव सुचविण्यात आले. त्यानुसार दोघांचीही नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर स्थायी समिती सदस्यांची संख्या निश्चिती करण्यात आली. भाजप-सेना व आघाडी अशा तिन्ही गटांनी सदस्य संख्या ठरविताना स्थायी समितीत सभापतीसह पाच सदस्य संख्या असावी, असे लेखी सुचविले. मात्र, यावेळी तौलिक बलाबल आघाडीच्या गटाचे जास्त असल्याने आघाडीने सुचविलेली सदस्यसंख्या घेण्यात आली. तसेच स्थायी समितीचा अध्यक्ष हा पदसिद्ध म्हणून नगराध्यक्ष असेल, असे ठरविण्यात आले.
त्यानंतर विषय समित्या व सदस्य संख्या ठरविण्यात आली. चार विषय समित्या ठरविण्यात आल्या. त्यात सदस्यसंख्या पाच असावी, असे ठरविण्यात आले.
या विशेष सभेत बांधकाम, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण तसेच पाणीपुरवठा आणि बाजार अशा विषय समित्या ठरविण्यात आल्या. बांधकाम समितीमध्ये आघाडीचे दोन, सेनेचा व भाजपाचा स्वतंत्र गट असल्याने प्रत्येकी एक आणि सेना-भाजप युतीचा संयुक्त एक असे सदस्य ठरविण्यात आले. त्यापैकी आघाडीकडून मनसेचे नगरसेवक रामचंद्र सोमा ठाकूर व सेनेच्या बंडखोर नगरसेविका संध्या राजेश प्रसादी यांचे, तर भाजपाने चेतन सुभाष चव्हाण, सेनेने संतोष विश्राम म्हावळंकर, तर युतीचा संयुक्त म्हणून सुधीर सुरेश पनवेलकर याचे सदस्य म्हणून नाव सूचविण्यात आले.
शिक्षण व आरोग्य विषय समितीमध्ये आघाडीकडून उपमा गोपाळ गावडे, हर्षदा हनुमंत खरवत यांचे, तर भाजपाकडून प्रमोद बाबू कोळेकर, सेनेकडून दिवाकर लवू गवस व युतीचा संयुक्त म्हणून वैष्णवी विष्णू रेडकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
पाणी पुरवठा व बाजार समितीचा सभापती हा नगरपंचायतीचा पदसिद्ध सभापती असल्याने ही विषय समिती आपूसकच आघाडीकडे गेली. याठिकाणी आघाडीकडून अरूण विठ्ठल जाधव, भाजपाच्या चेतन सुभाष चव्हाण, सेनेच्या सुषमा लवू मिरकर, तर सेना-भाजपाचा संयुक्त सदस्य म्हणून लीना महादेव कुबल यांची निवड करण्यात आली.
महिला व बालकल्याण समितीत आघाडी व भाजपाकडून रेश्मा उद्देश कोरगावकर यांचे नाव सुचविण्यात आले. या समितीत सदस्य म्हणून आघाडीकडून विनया विनायक म्हावळंकर, तर सेनेकडून लीना कुबल यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. (प्रतिनिधी)

कोरगावकर भाजपाच्या गोटात : स्थायी आघाडीकडे
नगराध्यक्ष निवडीवेळी काँगे्रसला मतदान करणाऱ्या भाजपाच्या बंडखोर नगरसेविका रेश्मा उद्देश कोरगावकर या मंगळवारी मात्र बॅक टू पॅव्हेलियन येत भाजपाच्या गोटात सामील झाल्या. बांधकाम समितीत सदस्य निवडीवेळी आघाडी व युतीकडून कोरगावकर यांचे नाव सुचविले.
स्थायी समितीच्या अध्यक्ष हा नगर पालिकेचा पदसिद्ध नगराध्यक्ष असल्याने आपसूकच स्थायी समिती आघाडीकडे गेली. तसेच पाणी पुरवठा व बाजार समितीचे सभापती पद हे उपनगराध्यक्षपदाकडे पदसिद्ध असल्याने तिन्ही समित्या आघाडीकडे गेल्या.

Web Title: The alliance's stake in the selection committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.