रेल्वेच्या संचालकांचे आडमुठे धोरण उमेश गाळवणकर यांचा आरोप
By Admin | Updated: September 5, 2014 23:25 IST2014-09-05T21:58:33+5:302014-09-05T23:25:29+5:30
कोकणी जनतेच्या प्राणाची आहुती देण्याची वेळ येईल, असे वाटले नव्हते.

रेल्वेच्या संचालकांचे आडमुठे धोरण उमेश गाळवणकर यांचा आरोप
सावंतवाडी : कोकण रेल्वेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, असा आरोप के. आर. सी एम्प्लॉईज युनिटचे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केला.
कोकण रेल्वेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांनी कोकण रेल्वेला नवरत्न पुरस्कार मिळविण्यासाठी डागडुजीवर खर्च न करता रेल्वे चालवली असे सिद्ध करण्याच्या जिद्दीपोटी कोकण रेल्वेच्या प्रवाशांना वेठीस धरु नये. तसेच त्यांच्या प्राणाची बाजी लावू नये व त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असे मला सांगावेसे वाटते. भानू तायल ही व्यक्ती कोकण रेल्वेसारख्या जागतिक प्रकल्पाच्या चेअरमनपदी नियुक्त केली जाते. त्या नियुक्तीचीच सीबीआय चौकशी करणे आवश्यक आहे.
ही व्यक्ती स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी संपूर्ण कोकण रेल्वेस वेठीस धरते. मनमानी पद्धतीने वागते व प्रवाशांचे जीव धोक्यात घालणारे निर्णय घेते. या निर्णयाविरोधात राजकीय नेतृत्वाने चौकशीची मागणी करुन आंदोलनाचा पवित्रा घेतला पाहिजे व महाराष्ट्राच्या सर्व खासदारांनी संसदेत आवाज उठवून कोकण रेल्वेला न्याय दिला पाहिजे. कोकणातील सामान्य जनतेला दळणवळणाचे साधन म्हणून कोकण रेल्वे उभारण्यात आली. पण याच कोकणी जनतेच्या प्राणाची आहुती देण्याची वेळ येईल, असे वाटले नव्हते.
दिवा पॅसेंजरच्या अपघातानंतर मुख्य सुरक्षा आयुक्तांनी रेल्वेची डागडुजी योग्यप्रकारे होत नाही. कारण त्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा कामगार वर्ग कोकण रेल्वेकडे नाही आणि डागडुजीसाठी आवश्यक वेळही कोकण रेल्वेकडे नाही.
या सर्वाला कोकण रेल्वेचे मुख्यालय जबाबदार आहे, असे स्पष्ट नमूद केलेले असताना गांभीर्याने दखल घेतली जात नाही. कोकणरेल्वेला अपघात होऊ नये, याकरिता उपाययोजना करुन प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन रेल्वेमंत्र्यांना खुश करण्यापेक्षा अपघात न होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. गाड्या कमीतकमी विलंबाने धावण्यासाठी प्रयत्नशील असणे, तसेच निर्धोक वाहतुकीसाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, अशी मागणी गाळवणकर यांनी केली आहे. मात्र, तसे होताना दिसत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. (वार्ताहर)