जिल्ह्यात सर्वपक्षीयांचे शक्तीप्रदर्शन
By Admin | Updated: September 28, 2014 00:22 IST2014-09-28T00:22:56+5:302014-09-28T00:22:56+5:30
विधानसभा निवडणूक : शेवटच्या दिवशी प्रशासनावर उमेदवारी अर्जांची बरसात

जिल्ह्यात सर्वपक्षीयांचे शक्तीप्रदर्शन
रत्नागिरी : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी प्रशासनावर उमेदवारी अर्जांचा पाऊसच पडला. अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन केल्याने पाचही मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शनिवारी एकाच दिवशी विक्रमी ४१ अर्ज दाखल झाले.
या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती संपुष्टात आल्याने आणि त्यासाठी कालावधी गेल्याने शेवटच्या दिवशीपर्यंत उमेदवारांना शनिवारपर्यंत वाट पहावी लागली. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख चारही पक्षांच्या उमेदवारांची घोषणा शेवटच्या दिवशी करण्यात आल्याने शनिवारी एकाच दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारांची रिघ लागली होती.
जिल्ह्यातील पाच जागांसाठी एकूण ६५ उमेदवारांनी १०१ इतके अर्ज दाखल झाले आहेत. यादी जाहीर करण्यास झालेला विलंब आणि युती-आघाडीतील फाटाफूट यामुळे शनिवारी ४१ अर्ज दाखल झाले.
दापोलीतून सर्वाधिक १२, गुहागरातून ४, चिपळुणातून ९, रत्नागिरीतून १० आणि राजापुरातून ६ असे एकूण ४१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. युती आणि आघाडीमधील मुख्य घटक पक्ष वेगवेगळे झाल्याने अनेक इच्छुकांना संधी मिळाली त्यामुळे या निवडणुकीत अनेकांना संधी मिळाली. तसेच काही पक्षांना तर उमेदवार म्हणून कोणाची निवड करावी, असाही प्रश्न पडल्याने अनेक नवखे चेहरे या निवडणुकीत आपलं नशिब अजमावण्यासाठी उभे राहिल्याचे दिसून येत होते.
अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असतानाही जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रत्नागिरीत उदय सामंत यांनी, दापोलीत किशोर देसाई, संजय कदम, राजापुरातून अजित यशवंतराव, गुहागरातून शिवसेनेचे विजय भोसले यांनी मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे अनेक ठिकाणी शनिवारी राजकीय वातावरण ढवळून निघाले असून रविवारपासून प्रचाराला सुरूवात होईल.(प्रतिनिधी)