केंद्र शासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल : राऊत
By Admin | Updated: November 5, 2014 00:03 IST2014-11-04T21:45:01+5:302014-11-05T00:03:28+5:30
खासदारांनी केला देवगड तालुक्याचा दौरा

केंद्र शासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल : राऊत
कुणकेश्वर : निसर्गाने कोकणाला भरभरून दिले असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोकण विकासाचे स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस आता आले असून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले. देवगड तालुका ग्रामीण भाग दौऱ्याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी सिद्धीविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, देवगड शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, महिला आघाडीप्रमुख वर्षा पवार, देवगड शहर युवा सेना अध्यक्ष तुषार तोडणकर, उपतालुकाप्रमुख उमेश कदम, महिला आघाडी संघटक प्रियांका गुरव आदी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे खुडी येथे हेदुबाई मंदिर येथे दर्शनानंतर माजी सरपंच प्रकाश मुणगेकर, दीपक कदम, बबन कावले, खुडी शाखाप्रमुख शिंदे, जोईल यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. सुभाष मयेकर यांनी विचार व्यक्त करून खुडी गावाच्या विकासाचे आश्वासन दिले. यावेळी खुडीतील ७ लाख रूपये रकमेच्या प्रस्तावित रस्त्याचे काम, साकव, शैक्षणिक व अन्य समस्या याबाबत निवेदन देण्यात आले.
यानंतर कोटकामते श्री देवी भगवती मंदिर येथे दर्शन घेऊन नारिंग्रे येथे गांगेश्वर मंदिर येथे भेट दिली. नारिंग्रे ग्रामपंचायतीत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच सुनील मेस्त्री, प्रकाश अभ्यंकर आदी उपस्थित होते. श्रीकांत गावकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी शाखाप्रमुख दीपक गावकर यांच्याहस्ते राऊत यांचा गणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर दहिबाव येथे सरपंच शरद परब यांच्या हस्ते सत्कार स्वीकारून ओगले निवास येथे पत्रकार परिषद घेतली. राऊत म्हणाले, खासदारकी शोभेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा पाठपुरावा व आढावा, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहे. आनंदवाडी बंदर प्रकल्प, तारामुंबरी- मिठमुंबरी पुलामुळे विस्थापित कुटुंबाचा प्रश्न, नारिंग्रे ते मशवी रस्ता, अन्नपूर्णा नदीवरील धूपप्रतिबंधक बंधारा आदी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे सांगितले.
खासगी व सरकारी ठेकेदारीवर वचक ठेवून जवाहर रोजगार हमी योजनेतील विहिरी व इतर कामातील भ्रष्टाचार शोधून काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शिवसेना- भाजपचे युती सरकार लवकरच स्थापन होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. यानंतर मिठबाव येथे विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी भाजपचे देवगड तालुकाध्यक्ष सदा ओगले, काका ओगले, संदीप गुरव, विभागप्रमुख बबन कदम, पंचायत समिती सदस्य सुनील तिर्लोटकर, उपविभागप्रमुख बापू जुवाटकर, परेश रूमडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)