अल्बर्ट हॉवर्ड कृषिक्रांतीचे शिलेदार

By Admin | Updated: October 5, 2015 00:01 IST2015-10-04T21:56:52+5:302015-10-05T00:01:15+5:30

सेंद्रीय शेती पद्धतीचे जनक

Albert Howard Farmer | अल्बर्ट हॉवर्ड कृषिक्रांतीचे शिलेदार

अल्बर्ट हॉवर्ड कृषिक्रांतीचे शिलेदार

एखाद्या व्यक्तीची एका विशिष्ट कार्यासाठी नियुक्ती व्हावी, त्या व्यक्तीने संबंधित ठिकाणी गेल्यावर मूळ हेतू विसरून तेथील जनतेच्या आणि मातीच्या प्रेमात पडावे आणि त्यांच्यातीलच एक होऊन जावे. असेच काहीसे सर अल्बर्ट हॉवर्ड यांच्याबाबतीत घडले. भारतात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी आधुनिक पाश्चात्य शेती पध्दती भारतातील लोकांना शिकवण्यासाठी अल्बर्ट यांना ब्रिटिश शासनाने भारतात पाठवले. पण, भारतातील शेती पध्दतीच्या प्रेमात पडून ते शेती कशी करायची, हे पाहायचे असेल तर भारतात या, असे सांगू लागले. सर अल्बर्ट हॉवर्ड यांना सेंद्रीय शेती पध्दतीचा जनक असेही म्हटले जाते.
ब्रिटनमधील श्रॉपशायर परगण्यात रिचर्ड आणि अ‍ॅन हॉवर्ड या दाम्पत्याच्या पोटी अल्बर्ट यांचा ८ डिसेंबर १८७३ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण रेकीन महाविद्यालयातून झाले. पुढे त्यांनी सेंट जॉन कॉलेजमधून केंब्रिज विद्यापीठाची निसर्ग विज्ञान विषयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर १८८७मध्ये त्यांनी कृषीशास्त्राचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.
त्यांनी १९०२पर्यंत कृषीशास्त्राचा शिक्षक म्हणून इंपिरिअल डिपार्टमेंट आॅफ अ‍ॅग्रीकल्चरल कॉलेजमध्ये काम केले. नंतर त्यांची वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून कृषी महाविद्यालयात नियुक्ती झाली. १९०५पासून भारताचा कारभार पाहणाऱ्या खात्यामध्ये ते वनस्पती शास्त्रातील अर्थविषयक सल्लागार म्हणून काम पाहू लागले. त्यानंतर त्यांची भारतात पाश्चिमात्य शेती पद्धती रूजविण्यासाठी नियुक्ती करण्यात आली.
लॉर्ड कर्झन यांनी त्याकाळी पुसा येथे कृषी संशोधन संस्था सुरू केली होती. वारंवार पडणाऱ्या दुष्काळातून जनतेला वाचवायचे असेल तर कृषी उत्पादन वाढवण्याची नैतिक जबाबदारी सरकारची होती. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी भारतात लॉर्ड कर्झन यांच्या पुढाकाराने कृषी संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले होते. या संशोधकामध्ये अल्बर्ट यांचा समावेश होता. अल्बर्ट यांनी पुसा येथील कृषी संशोधन केंद्रात कार्य सुरू केले. मात्र, पाश्चिमात्य शेती पध्दती भारतात रूजविण्यासाठी आलेले अल्बर्ट भारतातील शेती पध्दतीच्या हळूहळू प्रेमात पडू लागले.
भारतीय शेती पध्दतीतून होणारे अन्नधान्याचे उत्पादन हे अधिक पोषक असल्याचे निरीक्षणांती त्यांच्या लक्षात आले. माती सकस असेल, वनस्पतींना आवश्यक असणारे सर्व अन्न घटक धारण करणारी मृदा असेल आणि अशा मातीत उत्पादित झालेले अन्न आहारात असेल तर मानव आणि पशू आजारी पडणार नाहीत, असे प्रतिपादन अल्बर्ट यांनी केले. हे निरीक्षण शास्त्रीय पातळीवर तपासून त्यांनी माती निरोगी असेल तर मानव आणि पशू निरोगी राहतील, असे सांगितले.
वनस्पती उद्योग विभागाचे संचालक म्हणून अल्बर्ट यांनी काम पाहिले. इंदौर आणि राजपुताना संस्थानचे ते कृषी मार्गदर्शक होते. त्यांची रॉयल सोसायटीने फेलो म्हणून नियुक्ती केली. इंदौरच्या शेती संशोधन केंद्राचे ते प्रमुख होते. त्यांच्या प्रथम पत्नी गॅब्रिएला आणि त्यांची बहीण (आणि अल्बर्ट यांची व्दितीय पत्नी) ल्यूसी याही वनस्पतीशास्त्रातील संशोधन करत होत्या. त्यांनीही महत्वपूर्ण कार्य केले. अल्बर्ट यांनी सेंद्रीय खत बनवण्याचा इंदौर पॅटर्न विकसित केला. तसेच अ‍ॅग्रीकल्चरल टेस्टामेंट हे सेंद्रीय शेतीचा पुरस्कार करणारे पुस्तक लिहिले. भारतीय शेती पध्दतीचा पुरस्कार करणारे फॉर्मिंग आॅर गार्डनिंंग फॉर हेल्थ आॅर डिसिज हे पुस्तक १९४०मध्ये प्रकाशित केले. याव्यतिरिक्तही त्यांनी अनेक शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित केली.
त्यांना १९३४ मध्ये त्यांना सर या उपाधीने सन्मानित करण्यात आले. मातीचे महत्व ओळखून रासायनिक खताचा प्रसार करायला आलेला हा संशोधक रासायनिक खताचा दुस्वास करू लागला, अर्थात खत कंपन्यांना हे मानवणारे नव्हते. मात्र, २० आॅक्टोबर १९४७ला शेवटचा श्वास घेईपर्यंत हा संशोधक भारतीय शेती पद्धतीचा पुरस्कार करत राहिला.
डॉ. व्ही.एन. शिंदे,
उपकुलसचिव,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

Web Title: Albert Howard Farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.