कृषी सहलीचे पैसे परस्पर हडप
By Admin | Updated: March 20, 2015 23:20 IST2015-03-20T22:58:44+5:302015-03-20T23:20:44+5:30
सावंतवाडी विभागातील प्रकार : सदस्याचा उपोषणाचा इशारा

कृषी सहलीचे पैसे परस्पर हडप
सावंतवाडी : कृषी विभागाने नेमलेल्या आत्मा समितीला विश्वासात न घेता परस्पर नागपूर येथे सहल काढून त्यांचा अडीच लाख रूपयांचा निधी परस्पर हडप केल्याचा प्रकार सावंतवाडी तालुका कृषी विभागात घडला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठवताच त्यातील काही रक्कम भरण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला पण शेतकऱ्यांच्या वाट्याचे पैसे अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. सावंतवाडी तालुका कृषी विभागाच्या कारभाराविरोधात आत्मा समितीचे सदस्य उपोषणाला बसणार आहेत.
याबाबत परब यांनी निवेदनातून दिलेली माहिती अशी की, कृषी विभागाच्या आत्मा समितीत ४२ जणांचा समावेश होता. त्यातील ४२ जणांना स्प्रे पंपाचे वाटप करण्यात आले होते. मात्र, यातील सर्वच्या सर्व पंप निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे काहींनी पंप दुरूस्त केले मात्र, यातील १७ जणांनी आपले पंप कृषी विभागाला परत केले. हे पंप जमा करून १ वर्ष उलटले तरी या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत हे पंप अदा करण्यात आले नाही. याबाबत अनेकवेळा तालुका कृषी अधिकारी ईश्वर गुरव यांना आत्मा समितीच्या सदस्यांनी जाब विचारला असता, हे पंप लवकरच येतील अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे काम हे अधिकारी करीत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत स्प्रे पंप मिळाले नाहीत. त्यामुळे आत्मा समितीचे सदस्य चांगलेच आक्रमक बनले आहेत.
फेबु्रवारी २०१४ मध्ये कृषी विभागाने आत्मा सदस्यांना सहलीचे आयोजन केले होते. मात्र, ज्या सदस्यांसाठी शासनाचा उपक्रम होता त्या सदस्यांना सहलीची माहितीच नव्हती. सहलीवर शासनाचे पंधराशे व स्वत:चे पंधराशे असे मिळून तीन हजार खर्च करण्याचे ठरले होते. त्यासाठी सदस्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. पण ही सहल नागपूर येथे जाणार हे निश्चित झाल्यावर त्यांच्या गाड्याही बुक केल्या. मात्र, सदस्यांना नागपूर येथे सहल जात असल्याची पुसटशी कल्पनाही दिली नाही. ज्या गाड्यांतून सहल नेली त्यात सदस्यांपेक्षा वेगळी माणसे नेण्यात आली. ती सदस्य तसेच कृषी मित्र असे दाखवल्याचा प्रकार उघड झाला आहे.
आत्माच्या सदस्यांना घेऊन सहलीचे आयोजन करण्याचा शासनाचा उद्देश होता. मात्र, हा उद्देश येथील कृषी विभागाने असफल ठरवत सहलीसाठी नेलेल्या शेतकऱ्यांकडूनच पैसे घेतले. यात शासनाकडून दीड हजार व सदस्याचे दीड हजार असे तीन हजार रूपये घेण्याचे शासनाचे परिपत्रक होते. मात्र नियम धाब्यावर बसवून येथील कृषी विभाागाने सर्वच पैसे शेतकऱ्यांकडून घेतले होते. यावर सदस्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता, आम्ही तुमचे पैसे काढून ठेवले आहेत, असे सांगितले. मात्र अद्यापही पैसे दिले नाहीत. (प्रतिनिधी)
चौकशीची मागणी
तालुका कृषी अधिकाऱ्यावर उत्तम परब यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कृषी विभागात लाखो रूपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. सर्व कृषी योजनेची चौकशी करावी, अशी मागणी करीत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा शुक्रवारी पत्रकातून दिला आहे.