कृषी पर्यटन अभ्यासक्रम सुरू करणार

By Admin | Updated: June 4, 2015 00:03 IST2015-06-03T21:37:05+5:302015-06-04T00:03:25+5:30

दीपक केसरकर : वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात पर्यटन विषयावर चर्चासत्र

Agricultural Tourism Course will be started | कृषी पर्यटन अभ्यासक्रम सुरू करणार

कृषी पर्यटन अभ्यासक्रम सुरू करणार

वेंगुर्ले : येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात अद्ययावत ‘कृषी पर्यटन’ विषयक अभ्यासक्रम सुरू करणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी कृषी पर्यटनातून स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी सर्वार्थाने सक्षम असेल, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आयोजित चर्चासत्रात केले.
वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ‘ग्रामीण कृषी विकास आणि कृषी पर्यटन’ या चर्चासत्राचे आयोजन पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वर्लू उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. वेंकटेश्वर्लू यांनी, कोकणात दरवर्षी लाखो पर्यटक येतात, अशा पर्यटकांना कृषी पर्यटनाकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. याकरिता कृषी पर्यटन प्रकल्पाची जास्तीत जास्त प्रसिद्धी एमटीडीसीच्या माध्यमातून देण्यात यावी, असे प्रतिपादन केले. पालकमंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारणारा तीन महिने, सहा महिने व बारा महिने कालावधींचा ‘कृषी पर्यटन’ विषयक अभ्यासक्रम हा देशातील पहिलाच अशा प्रकारचा उपक्रम असून, याला विद्यापीठाचे पूर्ण सहकार्य लाभेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव दीपक मोरे यांनी कृषी पर्यटन अभ्यासक्रमाचे महत्त्व विशद केले. जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी योग्य नियोजन झाल्यास पर्यटन व्यवसायामध्ये आपण गोवा राज्याच्याही पुढे जाऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक
डॉ. उत्तम महाडकर, अधिष्ठाता डॉ. रमेश बुरटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र साळगावकर यांच्यासह फळ संशोधन केंद्रातील तसेच विविध खात्यांचे अधिकारी व जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


‘मँगो व्हिलेज’ संकल्पना राबविणार\
पलकमंत्री केसरकर म्हणाले, केरळ व गोवा राज्यात ‘स्पाईप व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
या धर्तीवर सिंधुदुुर्ग जिल्ह्यात कृषी पर्यटनाखाली ‘मँगो व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्यात यावी.
या अभ्यासक्रमासाठी
आवश्यक निधी लवकरच विद्यापीठाला उपलब्ध करून दिला जाईल, असे केसरकर
यांनी सांगितले.

Web Title: Agricultural Tourism Course will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.