प्रत्येक महिन्यात कृषी मार्गदर्शन

By Admin | Updated: July 3, 2014 00:25 IST2014-07-03T00:24:37+5:302014-07-03T00:25:50+5:30

उदय परब : वेरळ येथे कृषी मेळावा, थेट संवाद कार्यक्रम राबविणार

Agricultural guidance every month | प्रत्येक महिन्यात कृषी मार्गदर्शन

प्रत्येक महिन्यात कृषी मार्गदर्शन

मालवण : कृषी मेळावे व प्रशिक्षण कार्यक्रमातून होणाऱ्या सूचना व मार्गदर्शनाची कार्यवाही होणे आवश्यक असून यासाठी पंचायत समिती सदस्य, कृषी अधिकारी, ग्रामपंचायत तसेच शेतकरी, ग्रामस्थांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. कृषीविषयक विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रशासनाचा शेतकऱ्यांशी थेट संवाद आवश्यक असून यापुढे प्रत्येक मतदारसंघात किंबहुना प्रत्येक गावात तेथील शेतकऱ्यांसाठी प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला कृषीविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन सभापती उदय परब यांनी वेरळ येथे कृषी मेळाव्यात बोलताना केले. कृषीदिनाचे औचित्य साधून मालवण पंचायत समिती व कृषी विभागाच्यावतीने वेरळ येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा वेरळ येथे कृषी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून सभापती परब बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्रावणी नाईक, जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभूगावकर, उपसभापती हिमाली अमरे, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, राजेंद्र प्रभूदेसाई, भाग्यता वायंगणकर, चित्रा दळवी, वेरळ सरपंच परब, उपसरपंच पूजा वेरलकर, तालुका कृषी अधिकारी करंजे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभूगावकर म्हणाले, कृषी योजनांची अधिक माहिती घेण्याच्यादृष्टीने ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. ग्रामसभेत शेतकरी ग्रामस्थांची उपस्थिती नगण्य असल्याने शेतकरी योजनांच्या लाभांपासून वंचित राहतात. तसेच भातशेतीत फायदा होत नसेल तर शेतकऱ्यांनी इतर पर्यायी पिके घेणे गरजेचे असून यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर म्हणाले, शेतीतून कमी उत्पन्न मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी यशस्वी शेतकऱ्यांचे अनुकरण केले पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणीटंचाई दूर करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग सिस्टीमचा वापर करावा. तसेच शासनाच्या ‘पाणी साठवा, गाव वाचवा’ या नव्या अभियानांतर्गत पाण्याचे नियोजन करणे बंधनकारक आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद तसेच राज्य पातळीवर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Agricultural guidance every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.