शेतकऱ्यांना वृक्षांच्या तोडीनंतर वाहतूक पास द्याव
By Admin | Updated: March 12, 2015 00:04 IST2015-03-11T23:15:58+5:302015-03-12T00:04:05+5:30
प्रमोद जठार : ‘ती’ अट रद्द करण्याची उपवनसंरक्षकांकडे मागणीे

शेतकऱ्यांना वृक्षांच्या तोडीनंतर वाहतूक पास द्याव
सावंतवाडी : जिल्ह्यातील मालकी वृक्षाच्या तोडीनंतरच्या वाहतूक प्रकरणी लागू केलेल्या २५/२ दाखल्याच्या अटी तत्काळ रद्द करा. या दाखल्याच्या अटीमुळे शेतकऱ्यांनी तोडलेली झाडे पावसामध्ये कुजून जात आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे या दाखल्याच्या अटी रद्द करून तोडलेल्या झाडांची वाहतूक परवाने पास देण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी व जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी उपवनसरंक्षक एस. रमेशकुमार यांच्याजवळ बुधवारी केली. यावर उपवनसंरक्षक रमेशकुमार यांनी दोन शेतकऱ्यांचे वाहतूक पास व लागू केलेल्या २५/२ दाखल्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून १३ मार्च रोजी यावर अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, मंगेश तळवणेकर, बळीराम सावंत, सुरेश सावंत, शकील शेख व शेतकरी उपस्थित होते. खासगी मालकी क्षेत्रातील निबंधित अधिसूचित वृक्षतोड करण्यासाठी महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम १९८४ नुसार वृक्ष अधिकारी यांच्याकडून परवानगी दिली जाते. तसेच जिवंत नदीनाल्यापासून ३० मीटर अंतरावरील अति उतारावरील, तसेच एकटी २० झाडे राखून न ठेवता वृक्षतोड करावयाची असल्यास महाराष्ट्र महसूल अधिनियम तरतुदीनुसार महसूल विभागाकडील परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु निर्बंधक किंवा अनिर्बंधित झाडांची तोड जिवंत नदीनाल्यापासून ३० मीटरच्या आत व्यावसायिक करीत नाहीत. शेतकऱ्यांनी यापूर्वी केलेल्या वृक्षतोडीबाबत एकही तक्रार वनविभाग किंवा महसूल विभाग यांच्याजवळ नाही, असे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्पष्ट केले.
तर तोडलेल्या झाडांसाठी तत्काळ वाहतूक पास द्या. अन्यथा येथून हलणार नाही, असा पवित्रा प्रमोद जठारांसह सर्व शेतकऱ्यांनी घेतला. यावर उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तत्काळ दोन शेतकऱ्यांना वाहतूक परवाने दिले. तर इतर शेतकऱ्यांच्या परवान्यांसंदर्भात दोन दिवसात वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. (वार्ताहर)