सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एकामेकांचे कार्यकर्ते घेण्यावरून शिंदेसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगला आहे. त्याच दरम्यान, शुक्रवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या बालेकिल्ल्यावर शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी हल्लाबोल केला आहे. कोलगाव ग्रामपंचायतचे तब्बल पाच सदस्य भाजपकडून फोडून शिंदेसेनेकडे वळवले गेले आहेत.सारंग यांनी आठ दिवसांत भाजप फोडून दाखवा असे आवाहन दिल्यानंतर, परब यांनी केवळ ४८ तासांतच कोलगाव येथून सुरुवात करत भाजपला धक्का दिला आहे. तसेच, शिंदेसेनेत तालुक्यातील १३६ सदस्य सहभागी होण्यास इच्छुक आहेत; मात्र महायुती म्हणून आमची भूमिका गुप्त राखण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या भाजपविरुद्ध शिंदेसेनेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये फोडाफोडीचा संघर्ष सुरू आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शिंदेसेनेची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्यानंतर शिंदेसेनेने या प्रकरणात उडी घेतली. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यावर शिंदेसेनेने जोरदार टीका केली. त्याला सावंतवाडी येथून महेश सारंग यांनी थेट उत्तर देत ‘हिंमत असेल तर भाजप पक्ष आठ दिवसांत फोडून दाखवा, नव्याने संघटना उभी करून निवडणुकीला सामोरे जाणार’ असे स्पष्ट केले.सारंग यांच्या आव्हानाला शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उत्तर देत, अवघ्या ४८ तासांतच महेश सारंग यांच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलगावमधील भाजपचे पाच ग्रामपंचायत सदस्य फोडले आहेत. यात आशिका अशोक सावंत, प्रणाली टिळवे, रोहन नाईक आणि सयोगिता उगवेकर यांचा समावेश आहे. या सदस्यांनी सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात भेट देत संजू परब यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांनी येथे एकाधिकार तोडल्याचेही रोहन नाईक यांनी सांगितले.
१३६ ग्रामपंचायत सदस्य भाजपमधून येण्यास इच्छुक ‘माझ्या मित्रांच्या बालेकिल्ल्यातूनच सुरुवात’, असे परब यांनी सांगितले. ‘माझा मित्र स्वतःच्या गावाचाही सांभाळ करू शकत नाही, तो मतदारसंघ सांभाळायला निघाला आहे. माझ्याकडे सावंतवाडी तालुक्यातील १३६ ग्रामपंचायत सदस्य भाजपमधून शिंदेसेनेत येण्यास इच्छुक आहेत; परंतु आमचे नेते दीपक केसरकर यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे सांगितले असल्याने प्रवेश थांबवला आहे. महेश सारंग यांनी दिलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून हे सदस्य आले आहेत, हा प्रवेश घेतला नाही. फक्त भाजपचे सदस्य हे आमच्यासोबत आहेत, हे मी त्यांना दाखवले आहे. म्हणून राजकारणात बॉस हा बॉस असतो. त्याला कोणी डिवचले तर काय होऊ शकते, याचा सारंग यांनी बोध घ्यावा. यापुढे आम्ही महायुतीचे काम करू, पक्षाचे वरिष्ठ नेते जे सांगतील ते निर्णय घेऊ, आणि सारंग यांनी केलेल्या टीकेला हे उत्तर आहे, असेही परब यांनी स्पष्ट केले.