इतिवृत्त वाचनानंतर नगरपरिषद सभा तहकूब
By Admin | Updated: July 10, 2014 23:34 IST2014-07-10T23:22:41+5:302014-07-10T23:34:54+5:30
मुख्याधिकारी नसल्याने

इतिवृत्त वाचनानंतर नगरपरिषद सभा तहकूब
वेंगुर्ले : मुख्याधिकारी नसल्याने नगराध्यक्षांनी दोन वेळा पुढे ढकललेली मासिक सभा आज गुरूवारी आयोजित केलेल्या तिसऱ्यावेळीही मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत चालविण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांनी केला. इतिवृत्त वाचनातील काही विषयावर खडाजंगी झाल्याने इतिवृत्त वाचनानंतर सभा तहकूब करण्यात आली. शहरात चालू असलेल्या विकासकामांबाबत संपूर्ण अहवाल तहकूब सभा लावण्यापूर्वी सादर करावा त्यानंतर तहकूब सभा चालू करावी, अशी मागणी मासिक सभेत नगरसेवकांनी केली.
वेंगुर्ले नगरपरिषदेची मुख्याधिकारी नसल्याने नगराध्यक्षांनी दोनवेळा पुढे ढकललेली सर्वसाधारण सभा आज गुरूवारी नगरपरिषदेच्या शिवाजी सभागृहात नगराध्यक्ष पूजा कर्पे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या सभेच्या सुरूवातीसच नगरसेवक प्रसन्ना कुबल, रमण वायंगणकर, सुलोचना तांडेल, निला भागवत आदींनी लेखी स्वरूपात नगराध्यक्ष पूजा कर्पे यांना नवीन नगराध्यक्ष निवड प्रक्रियेची फॉर्म भरण्याची तारीख ११ जुलै असून नगराध्यक्षांचा कालावधी जूनमध्ये संपला आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. १ ते ३० विषय सभेच्या अजेंड्यावर ठेवण्यात आले आहेत. त्यात अनेक आर्थिक विषयक कामे आहेत. ते विषय मंजूर केल्यास कदाचित नगरपरिषदेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अधिनियमातली तरतुदीनुसार ही सभा आपणास घेता येणार नाही. तरीही आपण ही सभा चालविली व अधिनियमांचा भंग झाल्यास त्यास आपण जबाबदार राहाल, असे निवेदन सादर करण्यात आले. यातील कायदेशीर बाबीबाबत मुख्याधिकारी यांनी सभेसाठी दिलेले प्रतिनिधी हनिफ म्हाळुंगकर यांनी जबाबदारी घ्यावी, अशी मागणी रमण वायंगणकर यांनी करताच अनेक नगरसेवकांनी हा विषय उचलून धरला. तरीसुध्दा सभा घेण्याचा आग्रह नम्रता कुबल यांनी केल्याने सभेचे कामकाज सुरू झाले.
मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देण्याबाबत इतिवृत्ताचे वाचन सुरू झाल्यानंतर त्या आल्या. शहरातील शिवाजी प्राथमिक शाळेचे चेकर्स बसविण्याचे काम निकृष्ठ झाले असल्याचा आरोप रमण वायंगणकर यांनी तर कंपोस्ट बागेतील अंतर्गत रस्ते व गोठण रस्ता यांचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर व दाजी परब यांनी केला. नगरसेवकांनाच प्रशासनातील प्रमुख अधिकारी वेळेत मिळत नाहीत. मग शहरातील विकास कामाबाबत सविस्तर व अचूक माहिती कशी मिळणार, असा सवाल नगरसेवक रमण वायंगणकर यांनी केला असता नगराध्यक्ष कर्पे यांनी योग्य व परिपूर्ण रिपोर्ट आल्याशिवाय कोणतीही बिले अदा करत नसल्याचे स्पष्ट केले. वेंगुर्ले शहरात दुर्गंधीची स्थिती निर्माण झाली असताना नगरपरिषदेची मैलावाहक गाडी ही वेंगुर्ले तालुक्याच्या बाहेर गेली कशी कोणाच्या परवानगीने गेली, या संदर्भात नगरसेवक महेश वेंगुर्लेकर यांनी सभागृह हालवून सोडले. नगरपरिषद प्रशासनाचा हा मनमानी कारभार असल्याचा आरोपही केला. भटवाडी येथील डॉन्टस कॉलनीच्यानजीक गटाराचे काम करताना फुटलेल्या पाईपलाईनचे काम का झाले नाही, असा सवाल रमण वायंगणकर व नीला भागवत यांनी केला. त्यावेळी म्हाळुंगकर यांनी आठ दिवसात पाईपलाईनचे काम पूर्ण होवून नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती
दिली. (प्रतिनिधी)