अखेर ‘त्या’ बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश
By Admin | Updated: January 14, 2015 00:30 IST2015-01-13T23:01:44+5:302015-01-14T00:30:21+5:30
मानव विकास योजना वाद : रास्तारोको आंदोलनानंतर तात्पुरता तोडगा

अखेर ‘त्या’ बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश
वैभववाडी : मानव विकास योजनेच्या एसटी बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यामुळे येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बसस्थानकासमोर तासभर रास्तारोको आंदोलन केले. मानव विकासच्या बसमध्ये नको तर आम्हाला पर्यायी सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रकांकडे केली. पोलीस व संस्था पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर अखेर मानव विकासच्या एसटीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन तात्पुरता तोडगा काढण्यात आला.
मानव विकासच्या बसेस बसस्थानकावर थांबवून न ठेवता कॉलेजच्या प्रांगणात आणाव्यात, या मागणीसाठी येथील हेमंत केशवराव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी बसस्थानकासमोर एसटी बस रोखली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना शांत करीत विद्यालयाच्या प्रांगणात एसटी बस न आणल्यास रास्तारोको आंदोलनाचा इशारा संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिला होता. (प्रतिनिधी)
एसटी ठरली कारणीभूत
एसटी प्रशासनाकडून येथील वाहतूक नियंत्रक आणि शिक्षण संस्थांना मानव विकासच्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन पत्र पाठविण्यात आले आहे. मानव विकासची एसटी सेवा फक्त मुलींसाठी असून विद्यार्थ्यांना त्या एसटी बसेसमधून प्रवास करता येणार नाही, असे महामंडळाने पत्रात म्हटले आहे.
परंतु महामंडळाने गेली तीन वर्षे याच बसेसमधून विद्यार्थिनींसह विद्यार्थी व अन्य प्रवाशांची वाहतूक करून शासन निर्णय धाब्यावर बसवत स्वत:चा फायदा करून घेतला. मात्र मानव विकासच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारताना एसटी प्रशासनाने त्या वेळेत पासधारक विद्यार्थ्यांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केले.
पोलिसांच्या मध्यस्थीमुळेच तोडगा
एसटी प्रशासनाकडून संस्थेला प्राप्त झालेल्या पत्रामुळे बसस्थानकावर विद्यार्थी गोंधळ घालणार, याची कल्पना आल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बसस्थानकात दाखल झाले. मात्र, वाहतूक नियंत्रक विद्यार्थ्यांच्या पर्यायी बसच्या मागणीची दखल घेत नसल्याचे लक्षात येताच बसस्थानकासमोर रास्तारोको केला. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, उपनिरीक्षक नितीन कुंभार, वाहतूक पोलीस अनमोल रावराणे, संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी वाहतूक नियंत्रक बोडेकर यांना फैलावर घेत त्यांच्या वरिष्ठांशी दूरध्वनीवर कानउघडणी केली. त्यानंतर मानव विकासच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन आंदोलनावर तोडगा काढला.
..तर पुन्हा आंदोलन
मानव विकासच्या बस विद्यालयाच्या प्रांगणातून सोडाव्यात, या मागणीसाठी सोमवारी आंदोलन झाले. तर या बसेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थ्यांनी मंगळवारी रास्तारोको केला. त्यामुळे मानव विकासच्या बसेस रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणातून सोडणे आणि त्या बसमधून विद्यार्थ्यांना प्रवासबंदी केली तर पर्यायी एसटी सेवा त्याचवेळेत उपलब्ध करणे या मागण्यांबाबत एसटी प्रशासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कॉलेज व्यवस्थापनाने महामंडळाला दिला आहे.
उशिरा सुचलेले शहाणपण
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ‘गाव ते शाळा’ या उपक्रमाद्वारे बारावीपर्यंत या मुलींना मोफत प्रवास योजना २०१२ मध्ये सुरू केली. त्यासाठी शासनाने ५ बसेस वैभववाडी तालुक्यासाठी एसटी महामंडळाच्या ताब्यात दिल्या. त्यांच्या देखभाल व इंधनासाठी दरवर्षी ५ लाख रूपये शासन महामंडळाला देते. मात्र मुलींसाठी असलेल्या मानव विकासच्या एसटी बसेसचा महामंडळाला लाभ व्हावा, या हेतूने मुलींसह अन्य प्रवाशांची तीन वर्षे वाहतूक केली.