खारेपाटणमध्ये अतिरिक्त वाळूसाठा जप्त
By Admin | Updated: September 23, 2014 23:57 IST2014-09-23T21:51:33+5:302014-09-23T23:57:51+5:30
प्रशासनाची धाड : वाळू व्यावसायिकांना चपराक

खारेपाटणमध्ये अतिरिक्त वाळूसाठा जप्त
खारेपाटण : खारेपाटण येथे विजयदुर्ग खाडी लागून असल्याने या खाडीला शुकनदीचे पात्र जावून मिळते. परंतु या नदीपात्रातील वाळू राजरोसपणे काढली जात असून काही ठिकाणी अनधिकृत साठा करून ठेवणे तसेच चोरटी वाहतूक करणे या गोष्टी घडत आहेत. परंतु या वाळू माफियांवर नुकतीच प्रशासनाच्यावतीने धाड टाकण्यात आली व अतिरिक्त वाळूसाठा जप्त करून दंड आकारणी करण्यात आली. त्यामुळे या कारवाईमुळे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू व्यावसायिकांना या निमित्ताने मोठी चपराक बसली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, खारेपाटणमध्ये चोरटी वाळू वाहतूक होत असल्याचे वृत्त प्रशासनाला मिळताच खारेपाटण तलाठी संतोष सावंत, वारगांव तलाठी सावंत, तळेरे तलाठी दीपक पावसकर यांच्यासह सर्कल गोखले व खारेपाटण पोलीस पाटील चंद्रकांत शेट्ये यांनी सामूहिकपणे शुकनदीवरील जैनपार भागात धाड टाकली.
यावेळी वाळू चोरी करणारे कामगार आपली हत्यारे, जाळ्या, पाट्या, घमेले, खोरी तेथेच टाकून पळून गेले. हे साहित्य पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले तर नदीपात्रातून १ ब्रास सुमारे २५०० रुपये किंमतीची वाळू जाग्यावर काढण्यात आली होती ती जप्त करण्यात आली.
तसेच खारेपाटण रामेश्वरनगर येथे खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक सहदेव कोंडविलकर यांच्या घराच्या जवळ अनधिकृत वाळू साठा केल्याचे आढळले. सुमारे ३ ब्रास वाळू साठा त्यांच्या घराजवळ सापडल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा तिथे पोहोचली व पंचयादी घालण्यात आली. यावेळी वाळू वाहतूक करणारे नितीन चव्हाण व बाळू उर्फ महादेव भीमराव चव्हाण हे बंधू अनधिकृतपणे आपल्या ट्रॅक्टरने नदीपत्रातील वाळू काढत असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, ते कारवाईवेळी सापडू शकले नाहीत. परंतु अनधिकृत वाळू साठा केल्याप्रकरणी कोंडविलकर यांना २० हजारांचा दंड आकारण्यात आला. खारेपाटणमध्ये अशाप्रकारची ही पहिलीच कारवाई करण्यात आल्यामुळे सरकारी मालमत्तेची राजरोसपणे होणारी लूट यामुळे येणाऱ्या काळात निश्चित थांबू शकेल. (वार्ताहर)