आरोंद्यात वाळू तस्करांवर कारवाई
By Admin | Updated: November 16, 2014 00:22 IST2014-11-16T00:22:31+5:302014-11-16T00:22:46+5:30
पावणेदोन लाखांचा दंड : चार होड्यांसह चारजणांना पकडले

आरोंद्यात वाळू तस्करांवर कारवाई
सावंतवाडी : आरोंदा येथील तेरेखोल खाडीत होणाऱ्या वाळू तस्करीवर सावंतवाडीचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून तस्करांना पकडले. या कारवाईत चार होड्या महसूल विभागाने जप्त केल्या आहेत.
यात प्रकाश विष्णू धानजी (वय ५३), सचिन पांडुरंग वेंगुर्लेकर (३०), राजन परब (४०), रोहिदास हरिश्चंद्र भाडलेकर (४५, सर्व रा. केरी पेडणे, गोवा) या चार होडीचालकांना ताब्यात घेतले असून, पावणेदोन लाखांचा दंडही ठोठाविण्यात आला आहे.
गोवा व सिंधुदुर्गला जोडणाऱ्या तेरेखोल खाडीत मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होते. याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीनंतर ओरोस पोलीस व सावंतवाडीतील उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सागरी गस्ती नौकेने समुद्रात जात होडीचालकांवर कारवाई केली.
चार होड्यांबरोबरच चार ब्रास वाळूही महसूल विभागाने जप्त केली आहे. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी समुद्रीमार्गे पोलिसांच्या सागरी गस्ती नौकेद्वारे ही कारवाई केल्याने वाळू तस्करांना चांगलाच दणका बसला आहे. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासमवेत तहसीलदार सतीश कदम, नायब तहसीलदार शशिकांत जाधव, मंडल अधिकारी यु. एस. हेळकर, आरोंदा तलाठी सी. नागराज, महसूल विभागाचे कर्मचारी मनोज निंबाळकर, रोहन पवार, आदींसह ओरोस येथील पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)