खासगी बसचालकांवरही कारवाई
By Admin | Updated: August 3, 2015 22:27 IST2015-08-03T22:27:29+5:302015-08-03T22:27:29+5:30
मद्यपानाविरोधी मोहीम : सिंधुदुर्गात जिल्हा वाहतूक शाखेची मोहीम

खासगी बसचालकांवरही कारवाई
बांदा : गोव्यातूून सिंधुदुर्गात येताना मद्यप्राशन करुन वाहन चालविण्यात येत असल्याने यामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खासगी आरामबसचालकही दारुच्या नशेत वाहन चालवित असल्याचेही निदर्शनास येत असल्याने अशा वाहनचालकांवर जिल्हा वाहतूक शाखेमार्फत तपासणी करून कारवाई केली जाणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी सिंधुुदुर्ग-गोवा सीमेवर विशेष मोहीम राबविली आहे.वाहतूक शाखेने ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह मोहिमेअंतर्गत केलेल्या कारवाईत खासगी आराम बसचे बहुसंख्य चालक हे दारुच्या नशेत आढळले. मद्यप्राशन करुन वाहन चालवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक शाखेमार्फत ही मोहीम राबवली जात आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी सांगितले की, खासगी आराम बसचालक हे गोव्यातून सिंधुदुर्गात येताना मद्यप्राशन करुन वाहन चालवतात. यामुुळे बसमधील प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. याबाबत पोलीस निरीक्षक इन्सुली तपासणी नाक्यावर आराम बसमधील प्रवाशांमध्ये जागृती केली आहे. बसमधून प्रवास करत असताना चालकाने मद्यप्राशन केले आहे का, याची खातरजमा प्रवाशांनीही करावी व तशी माहिती पोलिसांना द्यावी, अन्यथा प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर अशा मद्यपी वाहनचालकांवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी स्पष्ट केले. वाहनचालकांनी आपल्या तसेच वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मद्यप्राशन करुन वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन साबळे यांनी केले आहे.मद्यप्राशन करुन वाहन चालवणे हा गुन्हा असून, अशा वाहनचालकांवर कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. अवैध दारु वाहतुकीबरोबरच मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा बांदाचे पोलीस निरीक्षक संजय साबळे यांनी दिला आहे.
याबाबत संजय साबळे यांनी गोव्यातील विविध खासगी आरामबसच्या कंपन्यांना याबाबत पत्र पाठविले असून, आपल्या बसचालकांबाबत मद्यप्राशनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष देण्याचे आवाहन साबळे यांनी पत्रात केले आहे. (प्रतिनिधी)
वाहतूक शाखेमार्फत तपासणी करून कारवाई केली जाणार.
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम.
सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर राबवली जाणार मोहीम.
खासगी आरामबसच्या कंपन्यांना पत्र.