कणकवली : कणकवली तालुक्यात वाघेरी येथे सिद्धिविनायक मायनिंग करिता ५ वर्षासाठी सिलिका सँड व क्वार्टझाईड गौण खनिजासाठी भाडेपट्टा मंजूर करण्यात आला होता. संबधित खाणपट्टाधारक त्यांच्या खाणपट्ट्याबाहेरील खनिजाचा साठा करून विक्री करत असल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या खाणपट्ट्याची चौकशी होऊन तो खाणपट्टा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी दिले आहेत.सिद्धिविनायक मायनिंग करिता भागीदार म्हणून संजय आग्रे व संजना आग्रे यांच्या नावे हा भाडे पट्टा मंजूर करण्यात आला होता. २८ मे रोजी झालेल्या संयुक्त पाहणीनंतर भू विज्ञान व खणीकर्म संचालनालय नागपूर यांनी याबाबत अहवाल सादर केला होता. त्यानंतर या गौण खनिजाच्या साठ्याचे मोजमाप कणकवली तहसीलदार कार्यालयामार्फत घेण्यात आले होते.दरम्यान, सिद्धिविनायक मायनिंग करिता भागीदार संजय आंग्रे व संजना आंग्रे या खाणपट्टाधारकानी वाघेरी येथील गट नंबर ११४४/१/१ व ११४४/१/२ मधील क्षेत्र ४.९८ हेक्टर आर या क्षेत्रामध्ये आतापर्यंत केलेल्या उत्खननाबाबत व विक्री केलेल्या परिमाणाबाबत वरिष्ठ संचालक भूवैज्ञानिक यांचे प्रादेशिक कार्यालय, भूविज्ञान व खणीकर्म संचालनालय कोल्हापूर यांनी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे केलेल्या अहवालानुसार कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. याप्रकरणी संजय आग्रे यांनी जिल्हा खनीकर्म विभागाला खुलासा सादर केला होता. मात्र, हा खुलासा खनीकर्म विभागाने अमान्य केले.या प्रश्नी संबंधित खानपट्टाधारकानी त्यांच्या खाणपट्ट्यातून आतापर्यंत विक्री केलेले तसेच सद्यस्थितीत खाणपट्ट्यामध्ये साठा असलेले एकूण १ लाख २१ हजार ९८१ मेट्रिक टन एवढे सिलिका सँड व क्वार्टझाईड गौण खनिज अवैध असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे संबंधित खाणपट्टा धारकावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार नियमानुसार कारवाई करण्यासाठी कणकवली तहसीलदारांना आदेश दिल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांनी पत्रात म्हटले आहे. या आदेशामुळे मायनिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, अवैध मायनिंग सम्राटांचे धाबे दणाणले आहेत.
वाघेरीतील अवैध मायनिंगवर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश!, मायनिंग सम्राटांचे धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 18:27 IST