मच्छिमार्केटसाठी ८0 लाखांचा निधी प्राप्त
By Admin | Updated: July 7, 2015 23:17 IST2015-07-07T23:17:04+5:302015-07-07T23:17:04+5:30
अशोक तोडणकर : दोन महिन्यात काम होणार पूर्ण

मच्छिमार्केटसाठी ८0 लाखांचा निधी प्राप्त
मालवण : मालवण नगरपरिषदेने सोमवारपासून हाती घेतलेल्या मच्छिमार्केट नूतनीकरणासाठी शासनाकडून ७९.०६ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मत्स्यविक्रेत्या महिला व ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा पालिकेचा निर्धार असून दोन महिन्यात काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी दिली.
या नव्या दमाच्या मच्छिमार्केटमध्ये ८० ते १०० मत्स्यविक्रेत्या महिलांची बैठक व्यवस्था असणार आहे. तसेच मासे साठवून ठेवण्यासाठी पालिकेने कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था केली आहे. दरम्यान मत्स्य विक्रेत्या महिलांसाठी भाजी मंडईत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
मच्छिमार्केटमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पालिकेने मच्छिमार्केट नूतनीकरण करण्याचा पुढाकार घेतला आहे. सोमवारपासून नुतनीकरणाचे काम सुरु झाले आहे. ग्राहकांना व मत्स्यविक्रेत्या महिलांना अडचण येवू नये यासाठी मच्छिमार्केटचे नूतनीकरण करण्यात येत आहे. यात ८० ते १०० मच्छी विक्रेत्या महिलांसाठी बैठक व्यवस्था असणार आहे. दरदिवशी मासे विक्रीसाठी येणाऱ्या महिलांकडून ३०० रुपये इतका मासिक शुल्क आगाऊ स्वरुपात घेतला जाणार असून गाळा राखीव ठेवण्यात येणार आहे. तर आठवाड्यातून दोन-तीन दिवस मासे विक्रीसाठी येणाऱ्या महिलांकडून प्रतिदिन १० रुपये शुल्क आकारून मोकळ्या जागेत बैठक व्यवस्था करून देण्यात येणार आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना
दिली. (वार्ताहर)
मासे विक्री हे महिलांच्या रोजगाराचे मुख्य साधन आहे. येथील मत्स्य विक्रेत्या महिला व ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी ही आमची प्रमुख जबाबदारी आहे. सध्याच्या मच्छिमार्केटमुळे महिला व ग्राहकांना त्रास अथवा अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी पालिकेने पुढाकार घेत अद्ययावत मच्छिमार्केट उभारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला महिलांनी या कामाला विरोध दर्शवला होता. मात्र, मी दिलेल्या आवाहनाला मत्स्य विक्रेत्या महिलांनी पाठींबा दर्शवला. मासे विक्रीसाठी लगतच्या भाजी मंडईत व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच मच्छिमार्केटचे काम पूर्ण करून ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल. यासाठी मालवण नगरपरिषद कार्यरत आहे.
- अशोक तोडणकर, नगराध्यक्ष, मालवण
मासे साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअरेज
पालिकेच्यावतीने मत्स्य विक्रेत्या महिलांसाठी मच्छिमार्केटमध्ये कोल्ड स्टोअरेज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विक्रीचे मासे शिल्लक राहिल्यास मासे साठवणुकीसाठी कोल्ड स्टोअरेज फायदेशीर ठरणार आहे. तसेच विद्युतीकरण व पाण्याचीही व्यवस्था करून देण्यात येणार आहे. कोल्ड स्टोअरेजमध्ये मच्छी विक्रेत्या महिलांसाठी लॉकर प्रणाली असणार आहे.