मनसेचा वनअधिकाऱ्यांना घेराओ
By Admin | Updated: April 10, 2015 00:26 IST2015-04-09T22:43:08+5:302015-04-10T00:26:02+5:30
बेकायदा वृक्षतोड : कसई दोडामार्गमध्ये वनजमिनीत अतिक्रमण

मनसेचा वनअधिकाऱ्यांना घेराओ
सावंतवाडी : वनविभागाच्या कसई दोडामार्ग येथील जमिनीमध्ये सपाटीकरणाच्या नावाखाली अतिक्रमण करीत बेकायदा वृक्षतोड करण्यात आली असल्याची तक्रार मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केली आहे. त्यांनी या प्रश्नावरून उपवनसंरक्षक रमेश कुमार यांची गुरूवारी भेट घेत घेराओ घातला व जाब विचारला. उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे.
मनसेने उपवनसंरक्षकाना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कसई दोडामार्गमधील सर्व्हे नं. १५२ मध्ये केरळ येथील एकाने वनविभागाच्या जमिनीत अतिक्रमण केले आहे. तसेच जमीन सपाटीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रूपयांची मातीही विकली असून त्यात शेड उभारणी केली आहे.
यामध्ये या केरळीयनाने वनविभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. तसेच बळजबरीने १५०० एकर जमिनीत अतिक्रमण केले असून याबाबत अनेकवेळा दोडामार्ग वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या विषयाला पुरेसा न्याय दिला नाही. याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केली आहे. तसेच याप्रकरणी चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करीत दोडामार्ग वनअधिकाऱ्यांची ही चौकशी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सागर कांदळगावकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)