अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्यास चोपले

By Admin | Updated: September 11, 2014 23:11 IST2014-09-11T21:42:15+5:302014-09-11T23:11:53+5:30

सावंतवाडीतील घटना : उभाबाजारातील सुवर्णकाराच्या दुकानाची नासधूस

Acid attacks threatened the attackers | अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्यास चोपले

अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देणाऱ्यास चोपले

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे सोन्याच्या कामासाठी पश्चिम बंगालहून आलेल्या अजिबुद्दीन बदुलतुल्ला मलिक याने अ‍ॅसिड मारण्याचा प्रयत्न केल्याने काही सुवर्णकारांनी त्याला बेदम चोप दिला व त्याच्या दुकानाचीही नासधूस केली.
या प्रकरणी सुरेंद्र मडगावकर याने पोलिसात मलिक याच्या विरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्याने मलिकने दागिन्यात सोन्याची घट केली तसेच जाब विचारण्यास गेल्यास अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
याबाबत माहिती अशी की, सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे मलिक यांचे सोने तासकाम करण्याचे दुकान आहे. मलिक हा स्थानिक सुवर्णकारांचे सोन्याचे काम स्वत: करीत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. याबाबत गुरूवारी सकाळी त्याला समजही देण्यात आली होती. पण तो ऐकला नाही. तरीही तो येथील काहींशी उध्दट भाषेत बोलू लागला त्यामुळे संतापलेल्या काहींनी त्याला जाब विचारला होता. त्यातच सुरेंद्र मडगावकर यांचे सोन्याचे तासकाम त्याच्याकडेच देण्यात आले होते. त्यातही तूट दिसून आली. याबाबत मलिकला विचारणा केली असता, त्याने उध्दट भाषेत सुवर्णकारांशी वर्तणूक केल्याने संतापलेल्या काहींनी त्याला बेदम चोप दिला. यावेळी बाळा मडगावकर यांनाही दुखापत झाली.
तसेच त्यांच्या दुकानाचीही नासधूस केली. मलिक याला मारहाण करण्यात आल्यानंतर बराचवेळ तो तसाच पडून होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. उशिरापर्यंत सावंतवाडी पोलीस ठाण्यात सुरेंद्र मडगावकर यांचीच तक्रार नोंद करण्यात आली होती. तर पोलीस मलिक यांचा जबाब नोंदवण्याचे काम करीत होते. या घटनेनंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात सुवर्णकारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित गर्दी केली होती. (प्रतिनिधी )

Web Title: Acid attacks threatened the attackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.