आचरेकरांचा पर्ससीननेट
By Admin | Updated: November 28, 2014 00:08 IST2014-11-27T22:34:28+5:302014-11-28T00:08:57+5:30
मच्छिमारांचा हिसका : जाळी, नौका किनाऱ्यावर ठेवल्या

आचरेकरांचा पर्ससीननेट
मालवण : अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमारांनी कारवाईचा हिसका दाखविताना आज सर्जेकोट बंदरात मासेमारी करत असलेल्या येथील दादा आचरेकर यांचा मिनी पर्ससीननेट ताब्यात घेतला. पकडलेल्या पर्सनेट नौकेला दांडी किनाऱ्यावर घेऊन येत त्यावरील जाळी व नौका चौकचार मंदिरानजीक किनाऱ्यावर आणून ठेवण्यात आली.
बुधवारी सायंकाळी देवबाग समुद्रकिनाऱ्यावर निवती येथील मासेमारी करणाऱ्या दोन मिनी पर्ससीन नौकांना पकडल्यानंतर पुन्हा आज गुरुवारी सायंकाळी येथील पारंपरिक मच्छिमारांनी दादा आचरेकर यांचा मिनी पर्ससीनेट त्यावरील जाळ्यांसह सर्जेकोट येथून ओढून आणत दांडी किनाऱ्यावर पकडून ठेवण्यात आला आहे. पकडण्यात आलेल्या नौकेबाबत उद्या चौकचार मंदिरात बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. आचरेकर यांची पर्ससीन नेट नौका पकडल्यानंतर तिला किनाऱ्यावर आणण्यासाठी दांडी येथे सुमारे २00 ते २५0 पारंपरिक मच्छिमार जमा झाले होते.
गुरुवारी सकाळी चौकचार मंदिर येथे झालेल्या पारंपरिक मच्छिमारांच्या बैठकीत स्थानिक परंतु अनधिकृत विनापरवाना मासेमारी करणाऱ्या मिनी पर्ससीननेटधारक नौकांवर कारवाई करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला होता. याच बैठकीत पर्ससीननेटधारक आचरेकर हे स्थानिकांना जुमानत नाहीत. पारंपरिक मच्छिमारांच्या हिताच्या विरोधात अनधिकृत मासेमारी करत असल्याने त्यांना समज देण्यात यावी अशी मागणी मच्छिमारांनी लावून धरली होती. आचरेकर यांच्याबाबत पारंपरिक मच्छिमारांमध्ये असंतोष होता. याचाच परिणाम म्हणून अनधिकृत मासेमारी करणाऱ्या आचरेकर पिता पुत्रांना धडा शिकवावा म्हणून स्थानिक पारंपरिक मच्छिमारांनी त्यांची पर्ससीन नौका पकडून आणली आहे.
पर्ससीन नौकेला किनाऱ्यावर आणल्यानंतर दादा आचरेकर यांना समज देताना पारंपरिक मच्छिमारांच्यावतीने छोटू सावजी यांनी त्यांना उद्या गावासमोर काय तो निर्णय होईल असे सांगितले. मच्छिमारांनी काहीही संबंध नसलेले आज अनधिकृतरित्या टॉलर्स बाळगून आहेत. अशा अनधिकृत मासेमारी विरोधात मत्स्य विभागाने कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, मस्त्य विभाग निष्क्रिय असल्याने आम्हाला कारवाई करावी लागत आहे. आम्ही अजूनही संयम बाळगून आहोत, असेही सावजी म्हणाले. मत्स्य अधिकारी रवींद्र मालवणकर यांना मच्छिमारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मच्छिमारांनी प्रश्नांचा भडिमार करत त्यांना धारेवर धरले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक केराम यांनी मच्छिमारांना शांत राहण्याचे आवाहन
केले. (प्रतिनिधी)