‘राम’ नामाने आचरानगरी दुमदुमली
By Admin | Updated: March 29, 2015 00:51 IST2015-03-29T00:51:12+5:302015-03-29T00:51:32+5:30
रामेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी : शाही थाटात संस्थानचा रामजन्मोत्सव साजरा

‘राम’ नामाने आचरानगरी दुमदुमली
आचरा : ऐन मध्यान्हाचा समय, भर दुपारचे १२ वाजले, उन्हाचे चटके पायांना बसत होते. सूर्य डोक्यावर आला होता. वातावरणातील उष्म्याच्या झळा वाढलेल्या... हरिदास बुवांचे कीर्तन रंगात आलेले.... आणि ऐतिहासिक रामेश्वर मंदिराच्या परिसरात तोफा दणाणल्या... मंगल वाद्ये वाजू लागली... बंदुकीच्या फैरी झडू लागल्या... रामेश्वर मंदिरात पाळणा हळूहळू खाली येवू लागला... आणि ‘जय जय रघुवीर समर्थ’ची ललकारी आसमंतात दुमदुमली. गुलाल, अक्षतांची उधळण सुरु झाली. शाही थाटात रामेश्वर मंदिरातील रामजन्म उत्सवाला प्रारंभ झाला.
हा मंगलमय क्षण होता ‘राम जन्मोत्सवाचा’ या क्षणाची ‘याची देही याची डोळा’ साक्षात अनुभूती घेण्यासाठी हजारो भाविकांनी रामेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये तुफान गर्दी केली होती. सर्वत्र एकच आवाज गुंजत होता. ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला...’ राम जन्मोत्सवाचा हा अनोखा दिमाखदार सोहळा संस्थानकालीन आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वराच्या मंदिरासह जिल्ह्याच्या विविध भागात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
या उत्सवाच्या मंगलदायी क्षणाची अनुभूती घेण्यासाठी मंदिराचा परिसर भाविकांनी ठिकठिकाणी गजबजून गेला. यानंतर श्री रामाच्या गुणगानात शाही संस्थांनी थाटात रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. नंतर सुंठीवडा प्रसाद व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. राम जन्मावर विविध गीतगायन सादर करण्यात आले.
सकाळपासून रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था आचरावासियांतर्फे करण्यात आली होती. विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या बहारदार गायकीने या उत्सवाला द्विगुणीत केले. सायंकाळी पुराणवाचन करण्यात आले. रात्री महापूजा, नेत्रदीपक पालखी सोहळा पार पडला. पालखी सोहळ्यानंतर व्यासबुवांचे कीर्तन झाले. मोठ्या उत्साहात रामनवमी उत्सव पार पडला. या उत्सवासाठी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा व पोलीस यंत्रणेने सतर्कता बाळगली होती.(वार्ताहर)