आरोपीचा न्यायालयातून पलायनाचा प्रयत्न
By Admin | Updated: September 29, 2015 23:57 IST2015-09-29T23:25:00+5:302015-09-29T23:57:40+5:30
पोलिसांनी पकडले : सावंतवाडीतील प्रकार

आरोपीचा न्यायालयातून पलायनाचा प्रयत्न
सावंतवाडी : पोटगीच्या गुन्ह्यात न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यामुळे फरार झालेल्या इन्सुली येथील संदीप लक्ष्मण सावंत (वय ३५) याला बांदा पोलिसांनी डेगवे येथून पकडले. मात्र, न्यायालयाच्या आवारात पाणी पिण्याच्या बहाण्याने न्यायालयातून त्याने पलायन केल्यामुळे एकच खळबळ उडाली. मात्र, पोलीस व नागरिकांनी सबनीसवाडा भागात त्याला पकडले व न्यायालयासमोर हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संदीपने दोन विवाह केले आहेत. पहिल्या पत्नीला सोडल्याने तिने संदीपविरोधात येथील न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केला होता. त्या दाव्याप्रकरणी न्यायालयाने त्याच्यावर अटक वॉरंट बजावले होते. दरम्यान, संदीप हा डेगवे येथे असल्याचे बांदा पोलिसांना समजले. त्यामुळे त्यांनी तेथून मंगळवारी त्याला ताब्यात घेतले व येथील न्यायालयात हजर केले. सुनावणीची वेळ दुपारनंतर असल्याने संदीपला घेऊन पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश पावस्कर न्यायालयाच्या आवारात उभे होते. त्याचवेळी संदीपने पाणी पिण्याचा बहाणा करत न्यायालयाच्या गेटवरून उडी मारून पलायन केले. ते पाहताच हेडकॉन्स्टेबल पावस्कर व जी. डी. सावंत यांनी त्याचा पाठलाग केला. नागरिकांच्याही हे लक्षात येताच त्यांनी संदीपला सबनीसवाडा येथील ओंकार सोसायटीजवळ पकडले. त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी आरोपी पळाला नसून त्याला पकडल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)