फरार आरोपी अखेर सात वर्षांनी अटकेत
By Admin | Updated: September 23, 2014 23:55 IST2014-09-23T22:07:58+5:302014-09-23T23:55:15+5:30
देवरुख पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सोलापूर येथे जाऊन तब्बल सात वर्षे फरार असलेल्या या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

फरार आरोपी अखेर सात वर्षांनी अटकेत
मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव (साखरपा) येथील अपघातप्रकरणी एकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेला ट्रकचालक अपघातानंतर फरार झाला होता. मात्र, देवरुख पोलिसांनी सोमवारी सायंकाळी सोलापूर येथे जाऊन तब्बल सात वर्षे फरार असलेल्या या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आनंद साहेबराव थोरे (३३) असे या आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे.
आनंद थोरे (वरवडे, ता. माडा-सोलापूर) हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच ०४ एच ३२१२) घेऊन १४ एप्रिल २००७ रोजी रत्नागिरीहून कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगात जात होता. याचवेळी रात्री ८.१० वाजण्याच्या सुमारास ट्रक कोंडगावतिठा येथे आला असता समोरुन येणाऱ्या रिक्षाला ट्रकची जोरदार धडक बसली.
या अपघातामध्ये रिक्षातील एकजण ठार झाला होता, तर महिला गंभीर जखमी झाली होती. अपघात घडल्यानंतर ट्रकचालक थोरे हा फरार झाला होता. देवरुख पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याच्याविरोधात भादंवि ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
अनेकवेळा त्याचा शोध घेऊनही तो सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते. अनेक वर्षे तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर तो आपल्या वरवडे गावी असल्याची कुणकुण देवरुख पोलिसांना लागताच पोलीस हवालदार एन. के. रोडे, ए. बी. पावले, पो. कॉ. व्ही. एस. कांबळे, डी. एन. वाडेकर आदींनी सोमवारी वरवडे गाठले व सापळा रचून थोरे याला घरातून ताब्यात घेतले. ही कारवाई सायंकाळी ४ वाजता करण्यात आली.
यानंतर मंगळवारी त्याला देवरुख पोलीस ठाणत आणून अटक करण्यात आली. सायंकाळी त्याला देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, देवरुख पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॅनियल बेन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तब्बल सात वर्षांनंतर आरोपीला गजाआड केले. देवरूख पोलिसांनी आरोपी गजाआड करून केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. (वार्ताहर)