Sindhudurg: दोडामार्ग परिसरात दिवसाढवळ्या आढळला पट्टेरी वाघ

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 16, 2024 06:29 PM2024-03-16T18:29:42+5:302024-03-16T18:31:01+5:30

काही काळ स्तब्ध, जंगलात ठोकली धूम

A striped tiger was found in the rocky Dodamarg road in Sindhudurg | Sindhudurg: दोडामार्ग परिसरात दिवसाढवळ्या आढळला पट्टेरी वाघ

Sindhudurg: दोडामार्ग परिसरात दिवसाढवळ्या आढळला पट्टेरी वाघ

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली ते दोडामार्ग तालुक्यातील मांगेली अन् पुढे गोव्याचे म्हादई खोरे हा सह्याद्रीचा पट्टा ‘टायगर कॉरिडॉर’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी वन्यजीव अभ्यासक व पर्यावरणतज्ज्ञ करीत असतानाच शनिवारी दोडामार्ग परिसरात  दिवसाढवळ्या एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे.

शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस व त्यांच्या सहकाऱ्यांना हा वाघ दिसून आला. त्यांनी तो आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केला. या घटनेमुळे मात्र वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, इथली जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

आंबोली ते मांगेली आणि पुढे म्हादई खोरे हा सह्याद्री पट्ट्याचा परिसर जैवविविधतेने संपन्न आहे. या ठिकाणी विविध प्रजातींचे दुर्मीळ पशू-पक्षी आणि प्राणी आढळतात. पट्टेरी वाघाचे अस्तित्व देखील या भागात असल्याचे बोलले जात होते. अनेकदा ते सिद्धही झाले; मात्र वनविभाग अनेकदा ते नाकारत होता; मात्र आता तर पट्टेरी वाघाचे अस्तित्व दाखवून देणारी आणि वनविभागाच्या डोळ्यांत अंजन घालणारी घटना घडली आहे.

दोडामार्ग परिसरात पट्टेरी वाघ आढळून आल्याने इथली जैवविविधता समोर आली आहे. शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत काही कामानिमित्त शनिवारी सकाळी ११:३० वा.च्या सुमारास कारने तळकटहून कुंभवडेच्या दिशेने जात होते. या रस्त्यावरील खडपडे येथे त्यांची कार आली असता रस्त्यालगतच्या जंगलातील ओहोळातून एक पट्टेरी वाघ जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ कारचालकास कार थांबवण्यास व वाघ असल्याचे सांगितले.

काही काळ स्तब्ध, जंगलात ठोकली धूम

गणेशप्रसाद गवस व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पट्टेरी वाघाची छबी त्यांच्या मोबाइलमध्ये कैद केली. त्याचे काही व्हिडीओ देखील काढले. वाहन थांबल्याचे पाहून वाघही काहीवेळ एका जागेवर स्तब्ध उभा राहिला. त्यानंतर वाघाने जंगलात धूम ठोकली; मात्र या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी सुखावले आहेत.

Web Title: A striped tiger was found in the rocky Dodamarg road in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.