रेशनिंगचा ९0 टन गहू निकृष्ट
By Admin | Updated: September 11, 2015 23:39 IST2015-09-11T21:32:05+5:302015-09-11T23:39:29+5:30
दोडामार्गचे ग्रामस्थ संतप्त : पुरवठा अधिकारी धारेवर, परत पाठविण्याची मागणी

रेशनिंगचा ९0 टन गहू निकृष्ट
दोडामार्ग : गणेशोत्सवात वितरीत करण्यात येणारा दोडामार्ग तालुक्यातील रेशनिंग दुकानदारांना पुरवठा विभागाकडून आलेला नव्वद टन गहू निकृष्ट असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी जागरुक नागरिकांनी उघडकीस आणला. साटेली-भेडशी येथील गोडावूनमध्ये आलेला हा गहू खाण्यायोग्य नसल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांच्यावर अनेक प्रश्नांची सरबत्ती करत निकृष्ट गहू वितरणाचा डाव हाणून पाडला. हा गहू तत्काळ परत पाठवून चांगला गहू वितरीत करण्याची मागणी केली. गणेशोत्सवाचा सण तोंडावर आल्याने तालुक्यातील रेशनिंग धान्यदुकानदारांना वितरीत करण्यासाठी जिल्हाच्या पुरवठा विभागाकडून गहू आणण्यात आला आहे. तालुक्यात अशी २१ रेशनिंग दुकाने असून त्यांना ९० टन गव्हाचे वितरण केले जाणार होते. हा गहू साटेली-भेडशी येथील गोडावूनमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, हा गहू निकृष्ट प्रकारचा असल्याचे समजताच ग्रामस्थांनी गोडावूनकडे धाव घेतली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तालुका पुरवठा अधिकारी आनंद कार्वेकर यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी या गव्हाची पाहणी केली व वास्तव मान्य केले. खाण्याच्या लायकीचा नसलेला हा गहू ताबडतोब परत पाठवून त्याबदली चांगला गहू पुरवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्याशिवाय हा गहू आपण वितरीत करू देणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी कार्वेकर यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. अनेक प्रश्न विचारत सामान्य जनतेच्या हक्काच्या रेशनिंगबाबत गांभिर्य का ठेवले जात नाही, असा सवाल विचारला. यावेळी कार्वेकर यांनी नरमाईचे धोरण स्विकारुन झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
प्रशासन खबरदारी घेणार : कार्वेकर --कार्वेकर यांनी याबाबतचे गांभिर्य वरिष्ठांना कळवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थ शांत झाले. शिवाय हा गहू तपासण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे कार्वेकर यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या उदरनिर्वाहाचा हा रेशनिंगचा गहू नेमका आताच कसा निकृष्ट आला, याबाबत ग्रामस्थ तर्कवितर्क लढवत होते. मात्र, प्रशासन याची खबरदारी घेईल, असे आश्वासन कार्वेकर यांनी दिल्याने तूर्तास या घटनेवर पांघरून घातले गेले.