रत्नागिरीत एका महिन्यात ९ बळी
By Admin | Updated: July 2, 2015 00:29 IST2015-07-01T22:52:59+5:302015-07-02T00:29:39+5:30
मोसमी पाऊस : विविध ठिकाणी पडझडीमुळे ७0 लाखांची हानी

रत्नागिरीत एका महिन्यात ९ बळी
रत्नागिरी : जूनमध्ये झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात पडझड झालेली घरे, गोठे, खासगी व सार्वजनिक मालमत्ता तसेच मृत जनावरे यामुळे ६९ लाख ८७ हजार ८७८ रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ९ जणांचे बळी गेले असून, त्यांच्या १२ वारसांना शासनाकडून मदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ८ जूनपासून पावसाला प्रारंभ झाला आहे. मात्र, त्याआधी अधूनमधून झालेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात अनेक घरे, गोठे, सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेले आठवडाभर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी त्यापूर्वी पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. छप्परांचे नुकसान, घरांचे पूर्णत: नुकसान तसेच झाडांचेही नुकसान झाले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत झाली असून, नैसर्गिक आपत्तीने अनेकांचे बळी घेतले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या ५६७ इतकी आहे तर गोठ्यांची एकूण संख्या ५२ आहे. घरांच्या एकूण नुकसानाची रक्कम ५५,७०, १२५ इतकी तर गोठ्यांची ७,१४,०१३ रूपये इतकी नोंदविण्यात आली आहे. अजूनही काही गावांमध्ये पंचनाम्याचे काम सुरु आहे.
या महिनाभरातील नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील मृत जनावरांच्या नुकसानाची रक्कम १,२१,५०० इतकी आहे. जिल्ह्यातील ९ व्यक्तींचा यात बळी गेला आहे. सार्वजनिक ३५ मालमत्तांचे आणि ४ खासगी मालमत्तांचे एकूण ५,८२,२४० रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानापोटी जिल्ह्यातील एकूण ६९,८७८७८ रूपयांच्या नुकसानाची नोंद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात ८ जूनपासून पावसाला प्रारंभ.
अधूनमधून झालेल्या वादळी पावसात अनेक ठिकाणी नुकसान.
अनेक ठिकाणी पडझड.
मृतांच्या १२ वारसांना शासनाकडून मदत.
जिल्ह्यात एकूण ६९,८७८७८ रूपयांच्या नुकसानाची नोंद.
सार्वजनिक ३५ मालमत्तांचे आणि ४ खासगी मालमत्तांचे एकूण ५,८२,२४० रुपयांचे नुकसान.