रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख रूपयांचे वाटप
By Admin | Updated: December 31, 2015 00:25 IST2015-12-30T23:00:40+5:302015-12-31T00:25:58+5:30
अवकाळी पाऊस : आंबा उत्पादकांना दिलासा

रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख रूपयांचे वाटप
रत्नागिरी : गतवर्षी अवेळीच्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. जिल्ह्यातील ७ हजार ३५७ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ५१ हजार ४११ रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवेळीच्या पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान झाले होेते. पंचनाम्यानंतर शासनाकडून हेक्टरी २५ हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना आंबा नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. बाधीत सर्वेक्षणानुसार रत्नागिरी तालुक्यातील १० हजार ७७५ शेतकऱ्यांना १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपये जाहीर करण्यात आले होते. पैकी ७ हजार ३५७ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ५१ हजार ४११ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ३ हजार १२१ सिंगल सातबाराधारकांना ४ कोटी ८२ लाख ३२ हजार १७५ रुपये, तर ४ हजार १४५ खातेदारांना ४ कोटी ४० लाख १९ हजार २३६ रुपयांचे वितरण करण्यात आले. सामायिक खातेदारांसाठी हमीपत्राची अट आहे. हमीपत्रानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
यामध्ये नोकरी - व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सातबारावरील अधिक नावांमुळे सहहिस्सेदारांची संख्या वाढते. मिळणाऱ्या भरपाईच्या रकमेपेक्षा संमतीपत्र तसेच येण्या-जाण्याचा खर्च अधिक होतो. त्यामुळे अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. वर्ष समाप्ती तसेच आर्थिक वर्ष समाप्ती जवळ असल्यामुळे नुकसान भरपाईचा निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची रक्कम घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. निधी परत जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी हमीपत्र तयार करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
७ हजार ३५७ शेतकऱ्यांना मिळाला लाभ.
फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान.
निधी परत जाण्यापूर्वी हमीपत्र तयार करून द्यावे; कृषी विभागाचे आवाहन.